मुंबईचा वंडरबॉय पृथ्वी शॉ

48

<< नवनाथ दांडेकर >>

रणजी पदार्पणातच शतक

मुंबई संघातून रणजी पदार्पण करताना २०१६-१७ या यंदाच्या मोसमात पृथ्वीने सलामीला येऊन शतक झळकावत महान खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा बहुमान मिळवलाय. पृथ्वी हा सचिन तेंडुलकरनंतर मुंबईसाठी शतक झळकावणारा दुसरा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरलाय. सध्या प्रशिक्षक राजीव पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी वांद्रे येथील एम.आय.जी क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षण घेतोय. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही त्याच्यासोबत या क्लबमध्ये शिकतोय.

राष्ट्रीय विक्रमला गवसणी

उजव्या हाताने धडाकेबाज फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करणाऱया पृथ्वीने नोव्हेंबर २०१३ मध्ये हॅरीस शील्ड शालेय क्रिकेटमध्ये रिझवी प्रिंग फिल्ड शाळेकडून खेळताना एलीट गटात ५४६ धावांची खेळी करीत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. त्याचा हा विक्रम जानेवारी २०१६ पर्यंत अबाधित होता. केवळ विक्रमावर न थांबता पृथ्वीने विविध वयोगटातील क्रिकेटमध्ये आपल्या खेळाची छाप पाडली. जिथे पृथ्वी खेळलाय तेथे तेथे त्याच्या पराक्रमाचे ठसे त्याने उमटवले आहेत. दोनदा क्रिकेट प्रशिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचा बहुमान मिळवत पृथ्वीने कर्तृत्व सिद्ध केलेय. पृथ्वीची विक्रमी खेळी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चारच दिवसांनी पृथ्वीने शालेय क्रिकेटमध्ये ३३० चेंडूंत ५४६ धावांच्या खेळीचा विक्रम नोंदवला हे विशेष.

तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले असाच पराक्रम १७ वर्षीय पृथ्वी शॉने रणजी करंडक उपांत्य लढतीत आपले पदार्पण करताना साकारलाय. मुंबईच्या या गुणी व हरहुन्नरी क्रिकेटपटूने शालेय क्रिकेटमध्ये नोंदवलेला ५४६ धावांचा विक्रम आताच कल्याणच्या प्रणव धनावडेने मोडलाय. पण शालेय क्रिकेटपासून ते थेट राष्ट्रीय क्रिकेटचा यशस्वी प्रवास करणाऱया मुंबईकर पृथ्वीने आपले फलंदाजीतले कौशल्य व आक्रमक खेळ दाखवत मुंबईला एक समर्थ सलामीवीर मिळाल्याचा आनंद सर्वांना दिलाय. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून क्रिकेटमध्ये आपली स्तुत्य वाटचाल करीत पृथ्वीने मुंबईकरांच्याच नव्हे तर देशवासीयांच्या आशा उंचावल्या आहेत. त्याचा खेळं पाहताना क्रिकेटशौकिनांना ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरच्या उमेदीतील खेळाची आठवण येते यातच पृथ्वीच्या खेळाचे मोठेपण दडले आहे. शालेय क्रिकेटसोबतच ज्युनियर क्रिकेट संघातून टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱया पृथ्वीने इंग्लंडच्या यॉर्कशायर ईसीबी काऊंटी प्रीमियर लीगमध्ये क्लीथॉर्प आणि ब्रॅडफिल्ड कॉलेज सध्याचे प्रतिनिधित्व केलेय. धडाकेबाज व जिगरबाज पृथ्वीदादाची क्रिकेट कारकीर्द अशीच बहरो अशी अपेक्षा आपण करूया!

ठाणे येथे जन्मलेल्या पृथ्वी शॉने वयाच्या तिसऱया वर्षापासूनच विरार क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे घ्यायला सुरुवात केली. बालपणातच आईचे छत्र हरपलेल्या पृथ्वीने शालेय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. मुंबईत वडिलांसोबत आल्यानंतर पृथ्वीच्या अंगच्या क्रीडागुणांना खऱया अर्थाने उजाळा मिळाला. रिझवी प्रिंगफिल्ड शाळा आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार व विभागप्रमुख संजय पोतनीस यांनी पृथ्वीचे क्रीडागुण अचूक हेरत त्याचे पालकत्व स्वीकारले. रिझवी शाळा आणि पोतनीस यांच्या मदतीचे सोने करीत पृथ्वीने आपली क्रिकेट कारकीर्द बालपणातच यशस्वी केली. त्याने प्रिंगफिल्ड शाळेचे व मुंबईच्या १६ वर्षांखालील क्रिकेट संघाचे यशस्वी नेतृत्व करीत त्याला मिळालेली संधी सार्थ ठरवली.

मुंबईला लाभलेल्या विलक्षण गुणसंपन्न पृथ्वी शॉने आपल्या कारकीर्दीत पॉली उम्रीगर संघ (२०११-१४), रिझवी प्रिंगफिल्ड हायस्कूल, मुंबई (२०१२-१३), मुंबई (१४ वर्षांखालील) संघ (२०११-१२), हायलेन क्रिकेट क्लब (२०१२), एकनाथ सोलकर संघ (२०१२-१३), मुंबई (१३ वर्षांखालील) संघ (२०१२-१३), ब्रॅडफिल्ड कॉलेज (२०१३-१४), हार्टले विन्टेनी (२०१४-१४), पटेल स्पोर्टिंग्ज क्लब (२०१३-१४) आणि मुंबई रणजी संघ (२०१६-१७) अशा विविध संघात खेळून आपली कारकीर्द यशस्वी केलीय. त्याचा लवकरच टीम इंडियात प्रवेश होवो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पृथ्वीची बॅट तेजाने तळपो हीच शुभेच्छा आपण सर्वांनी त्याला देऊ!

महान रणजीपटूंच्या पंक्तीत

तामीळनाडूविरुद्धच्या रणजी करंडक उपांत्य लढतीत पदार्पणातच शतकी खेळी करून पृथ्वीने मुंबईच्या १२ महान रणजीपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. या आधी बाबूभाई पटेल, खंडू रांगणेकर, माधव दळवी, वसंत अमलाडी, पी. जे. डिकीन्सन, माधव आपटे, विजय भोसले, सचिन तेंडुलकर, समीर दिघे, जतीन परांजपे, झुबीन भरुचा आणि अमोल मुझुमदार या क्रिकेटपटूंनी याआधी रणजी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. असा पराक्रम साकारणारा पृथ्वी शॉ हा तेरावा रणजीपटू ठरला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या