मागणीनुसार बनावट पासपोर्ट, व्हिसा, कोविड लसीकरण प्रमाणपत्रांचा झोल; कागदपत्रांची बनवाबनवी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अंधेरी पश्चिमेला मागणीनुसार बनावट पासपोर्ट, व्हिसा, कोविड लसीकरण प्रमाणपत्र, बँक अकाऊंट स्टेटमेंट पैशांच्या जोरावर बनवून दिले जात होते. दोघा आरोपींकडून अशा प्रकारे सर्रासपणे महत्त्वाच्या कागदपत्रांचा झोल सुरू होता. बनवाबनवीचा त्यांचा कारभार सुसाट सुरू असतानाच मुंबई गुन्हे शाखेने अखेर त्यांचा बंदोबस्त केला.

डी. एन. नगर मेट्रो स्टेशनच्या जवळ शिवशक्ती सोसायटीतील रूम क्रमांक 112 मध्ये काही इसम एक ते पाच लाखांत बनावट पासपोर्ट, व्हिसा आदी महत्त्वाचे कागदपत्र बनवून देत असल्याची माहिती युनिट-5 चे सहाय्यक निरीक्षक अमोल माळी यांना मिळाली. त्यानुसार आवश्यक माहिती काढल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, सदानंद येरेकर,  अजित गोंधळी, अमोल माळी, बेंडाले, साळुंखे आदींच्या पथकाने त्या रूमवर छापा टाकला. यावेळी रूममध्ये 28 वेगवेगळ्या  व्यक्तींचे पासपोर्ट, 16 व्यक्तींच्या पासपोर्टच्या प्रथम पानाची कलर प्रिंट आऊट, विविध व्यक्ती व देशांचे एकूण 24 व्हिसा, बनावट व्हिसा बनविण्यासाठी लागणारे विविध देशांच्या इमिग्रेशन विभागाचे बनावट रबरी शिक्के, विविध क्षेत्रीय पासपोर्ट  कार्यालयातील पासपोर्ट अधिकाऱ्यांचे बनावट रबरी शिक्के, पितळी डाय, बनावट बँक स्टेटमेंट बनविण्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळ्या शाखांचे एकूण 40 रबरी शिक्के अशा प्रकारे विविध साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांचा अशा प्रकारे झोल करणारे इम्तियाज अली शेख ऊर्फ  राजू भाई (62), त्याचा साथीदार सुधीर सावंत (38) या दोघांना पकडले. आरोपींनी यापूर्वी अनेक व्यक्तींना बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात पाठविले आहे.

या दोन्ही आरोपींना बनावट पासपोर्ट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. एक महिन्यापूर्वीच दोघे दिल्लीतील कारागृहातून जामिनावर बाहेर आले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दोन्ही आरोपींनी मुंबईत येऊन बनावट कागदपत्र बनविण्याचा गोरखधंदा सुरू होता.