शिवसेनेने शिंदे गटाचा माज उतरवला, प्रभादेवीत राडा; आमदार सदा सरवणकर यांचा गोळीबार; मुलासह 4 जणांवर गुन्हा

दादर पोलीस ठाण्यात संतप्त शिवसैनिकांचा ठिय्या, शिवसैनिकांवरील जबरी चोरीचा खोटा गुन्हा मागे

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न फुटीर आमदार सदा सरवणकर समर्थकांच्या चांगलाच अंगाशी आला. शिवसैनिकांनी या चिथावणीखोरांना शिवसेना स्टाईल इंगा दाखवत त्यांची जागा दाखवून दिली. मात्र हे पचनी न पडलेल्या फुटीर आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून प्रभादेवी तसेच पोलीस ठाण्याबाहेर फायरिंग केली. त्यांची ही कृती त्यांच्या चांगलीच अंगलट आली. गोळीबार करणाऱया सरवणकरांविरोधात गुन्हा दाखल करा, शिवसैनिकांविरोधातील खोटे गुन्हे मागे घ्या, या मागणीसाठी शिवसैनिकांनी रविवारी दादर पोलीस ठाण्याबाहेर दोन तास ठिय्या देत फुटीरांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. अखेर सदा सरवणकर, समाधान सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शिवसैनिकांविरोधातील खोटे गुन्हे मागे घेण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केल्याने राज्यभरातील शिवसैनिक संयम बाळगून आहेत. अशातच प्रभादेवी येथे फुटीर आमदार सदा सरवणकर यांच्या समर्थकांकडून शिवसैनिकांना वारंवार डिवचण्याचा प्रयत्न केला जात होता. याविषयीची माहिती विभागप्रमुख महेश सावंत यांनी दिली. मागील दोन महिन्यांपासून सतत शिवसैनिकांना डिवचले जात होते. त्यातच प्रभादेवी येथील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शिवसैनिकांकडे पाहून घाणेरडे चाळे करणे, टिपण्या करण्याची सरवणकर समर्थकांनी परिसीमा गाठली. विशेष म्हणजे शिवसैनिक महिलांकडे पाहूनही हे चाळे करण्यात आल्याने आपल्या पद्धतीने या शिवसैनिकांनी जाब विचारला. शुक्रवारी विसर्जन मिरवणुकीनंतर हा वाद मिटला. मात्र पुन्हा शनिवारी डिवचण्याचा प्रकार झाल्यानंतर शिवसैनिकांनी पुन्हा या चिथावणीखोरांना शिवसेना स्टाईल जाब विचारला. या वेळी शाब्दिक बाचाबाचीही झाली. यानंतर शनिवारी मध्यरात्री सदा सरवणकर समर्थक विभागप्रमुख महेश सावंत यांच्या घराबाहेर जमले आणि शिविगाळ करू लागले. या वेळी तिथे फुटीर आमदार सदा सरवणकर आणि समाधान सरवणकरही आले. सदा सरवणकर यांनी आपल्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक आपल्याला व आपल्या पत्नीलाही दाखवल्याचे महेश सावंत यांनी सांगितले. त्यांनी प्रभादेवी नाका परिसरात गोळीही झाडली. त्यानंतर सदा सरवणकर समर्थक संतोष तेलवणे याने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, प्रथमेश बीडु, विपुल ताटकर, यशवंत विचले, विजय पांडे, चंदन साळुंखे, संजय सावंत, दुतेश रहाटे यांच्यासह 25 शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली. या वेळी दादर पोलीस ठाण्याच्या परिसरात आलेल्या सदा सरवणकर यांनी तिथेही रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. ती आपल्या शेजारीच असलेल्या कॉन्स्टेबलच्या पायाला लागली असती असे महेश सावंत यांनी सांगितले.

सरवणकरांचे पोस्टर फाडले

फुटीर आमदार सदा सरवणकर यांनी दाखविलेल्या धाक, दडपशाहीचा शिवसैनिकांकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. गद्दार हाय हाय अशा घोषणा देत शिवसैनिक अक्षरशः रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी सदा सरवणकर समर्थकांकडून लावण्यात आलेले पोस्टर्स टराटरा फाडण्यात आले तसेच दगडफेकीच्याही घटना घडल्या.

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अरविंद सावंत

ठाकरे सरकारने गुंडांचा बंदोबस्त केला. त्यांच्या कारकीर्दीत एकही दंगा घडला नाही की तसे करण्याची कुणाची हिंमत झाली नाही. आताच्या राज्यकर्त्यांपैकी एक म्हणतो चून चून के मारेंगे, दुसरा म्हणतो तंगडय़ा तोडीन, तिसरा आमदार गोळीबार करतो, चौथी महिला खासदार पोलीस स्थानकात जाऊन गैरवर्तन करते. पण गुन्हा दाखल होत नाही. कारवाई होत नाही. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. शिवसेना कार्यकर्त्यांवर खोटा 395चा गुन्हा दाखल केला. तो काढून घेण्याची मागणीही आम्ही केली. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मग खरी शिवसेना काय हे ज्यांना कुणाला पाहायचंय त्यांना ते कळेल, असे सांगत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? राज्याचे गृह मंत्री, मुख्यमंत्री काय करत आहेत? आज राज्यकर्तेच गुंडगिरी करायला निघालेत. म्हणून राज्यात ही अवस्था निर्माण झालीय असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री, गृह मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

शिवसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे; शस्त्राचा गैरवापर केल्याप्रकरणी सरवणकरांवर गुन्हा

शिवसेना पदाधिकाऱयांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिल्याने अखेर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात शस्त्राचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे सदा सरवणकर, समाधान सरवणकर, संतोष तेलवणे, कुणाल वाडेकर व आणखी पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष तेलवणे याच्याकडून चेनचोरीची खोटी तक्रार करण्यात आली होती. ही चेन तेवलणे याच्याकडेच सापडल्याचे स्पष्ट झाले. अखेर शिवसैनिकांवर कलम – 395 अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात आला.

शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी दादर पोलीस ठाणे दणाणले

शिवसैनिकांविरोधात पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याची बाब कळताच शिवसेना नेते, सचिव, खासदार अरविंद सावंत, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत हे दादर पोलीस ठाणे परिसरात दाखल झाले. या वेळी मोठय़ा संख्येने शिवसैनिकही या ठिकाणी जमले होते. गद्दारांना धडा शिकवा, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत होती. सदा सरवणकर आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसैनिकांनी ही मागणी लावून धरत शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱयासह दादर पोलीस ठाण्यातच तब्बल दोन तास ठिय्या दिला. शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या आणि सदा सरवणकरांसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करा, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली.

सरवणकरांचे पिस्तूल जप्त करणार

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आता त्यांचे पिस्तूल जप्त करणार आहेत. शिवाय पिस्तुलातून झाडलेल्या पुंगळय़ाही शोधल्या जातील. विशेष म्हणजे, गोळीबाराची तक्रार दादर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली आहे.