छंदाला वयाचं बंधन नसतं, मुंबईतील ‘डान्सिंग’ आजीनं याड लावलं!

आपलं स्वप्नं पूर्ण करण्याचं वय आता निघून गेलंय, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आपला छंद, आपलं पॅशन जोपासायचं वय नसतं हे मुंबईतल्या 62 वर्षीय रवी बाला शर्मा या आजीबाईंनी सिद्ध करून दाखवलंय. सोशल मीडियावरील नव्या-जुन्या गाण्यांवरील त्यांच्या नृत्याविष्काराने अक्षरशः सर्वांना याड लावलंय.

रवी बाला शर्मा या आजीबाई मुंबईत आपल्या मुलासोबत राहतात. नृत्याची त्यांना लहानपणापासूनच आवड. शाळा, कॉलेजात असताना अनेक नृत्य स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. कॉलेज पूर्ण केल्यानंतर त्यांचे लग्न झाले. त्यानंतर एकापाठोपाठ एक जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावर पडल्या. नृत्य करणं सासरी आवडत नसल्याने त्यांनी नृत्य करणं सोडून दिलं होतं.

बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी नृत्य करायला सुरुवात केली असून सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीयो तुफान लोकप्रिय ठरतायत. एका नृत्य स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर झपाटय़ाने व्हायरल झाला. इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. तरुणच काय तर बॉलीवूड सेलिब्रेटीही या ‘डान्सिंग दादी’चे दिवाने झाले आहेत. दिलजीत सिंग दोसांज, कोरिओग्राफर टेरेन्स लुईस, इम्तियाज अली अशा बॉलीवूड सेलिब्रेटींनीही त्यांच्या टॅलेण्टचं कौतुक केलंय. या वयातही त्यांची ही जिद्द पाहून आपल्याला प्रेरणा मिळत असल्याची भावना तरुणांनी व्यक्त केलीय.

नृत्यानं दुःखातून सावरलं!

रवी बाला सांगतात, लग्नानंतर 27 वर्षांनी पतीचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा वेळी माझ्यातील कलेने मला साथ दिली. या दुःखातून सावरण्यासाठी मी स्वतःला नृत्यामध्ये गुंतवून घेतलं. आता कुटुंबही माझ्या पाठीशी उभं राहिलंय.

आपली प्रतिक्रिया द्या