सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम रुग्णालयात

सामना ऑनलाईन। मुंबई

सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना छातीत दुखत असल्याने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मणिरत्नम यांना हृदयाशी संबंधित आजार असून 2004 साली देखील युवा चित्रपटाच्या शूटींगदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकेश नावाच्या एका यूजरने टि्वटवर मणिरत्नम यांना हृदयाशी संबंधित तक्रार असल्याने ग्रीम्स रोड येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेऊन आहे, असेही लोकेशने टि्वटमध्ये सांगितले आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी काहीही माहिती सार्वजनिक केलेली नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली आहे.

आठवड्याभरापूर्वीच मणिरत्नम यांच्या Ponniyin Selvan या दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यास अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मंजूरी दिली, यात ऐश्वर्या राय बरोबरच सुपरस्टार अमिताभ बच्चन, अनुष्का शेट्टी, चियान विक्रम, अमाल पॉल, किर्ती, जयाराम रवि यांची या चित्रपटात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मणिरत्नम हे दक्षिणेतील दिग्गज चित्रपटनिर्माते आहेत. पण त्यांनी हिंदीमध्येही बॉम्बे, दिल से, रावण, रोजा, युवा, गुरु ही हे नामांकित चित्रपटही दिले आहेत.