दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा – प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा! आम आदमी पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना 2014-15 ते 2019-20 या काळात बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे लेखापरीक्षक नीलेश नाईक यांच्या लेखापरीक्षण अहवालावरून दिसत आहे. याबाबत नाईक यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात आपण लक्ष घालून गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

प्रवीण दरेकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी मुंबई बँकेला घोटाळय़ाचे कुरण बनवले होते. सहकार विभागाचे सहनिबंधक सुभाष पाटील यांनी दरेकरांच्या काळातील बँकेतील घोटाळय़ाबाबत 2013 मध्ये आपला अहवाल दिला होता, मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. तसेच सध्या सहनिबंधक बाजीराव शिंदे यांच्या सहकार कायदा कलम 89 अ च्या अहवालावर संथगतीने कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर बाजीराव शिंदे यांच्या अहवालावर विशेष लेखापरीक्षक नीलेश नाईक यांनी चाचणी लेखापरीक्षण करून आपला अहवाल दिला आहे. त्यामध्ये आढळलेल्या अनियमिततेबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच आपणही दोन महिन्यांपूर्वी दरेकर यांच्या मुंबई बँकेतील दोन हजार कोटी रुपयांच्या घोटाळय़ाबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र अद्याप दरेकर आणि त्यांच्या सहकाऱयांवर गुन्हा दाखल झाला नसल्याचे धनंजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जनतेच्या पैशाची लूट करणाऱया दरेकरांवर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.