दमदार… शानदार… अन् संस्मरणीय! आदित्य ठाकरे, अक्षयकुमार यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

32

सामना ऑनलाईन । मुंबई

युवासेना प्रमुख, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारामुळे गेल्या काही कालावधीत मुंबईतील फुटबॉलचा चेहरामोहराच बदलून गेलाय. अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलाला लाभलेला आंतरराष्ट्रीय दर्जा… वांद्रे येथे तयार होत असलेले ऍस्ट्रोटर्फ मैदान… सेंट झेवियर्स मैदानात लागलेल्या फ्लडलाइटस्… नव्याने सुरू झालेली वेबसाइट… मुंबईच्या संघांनी विविध वयोगटात केलेली उल्लेखनीय कामगिरी… अशा एकापेक्षा एक सरस घटनांनी मुंबईतील फुटबॉल उजळून गेले असतानाच आदित्य ठाकरे व राष्ट्रपती पुरस्कार विजेता अभिनेता अक्षयकुमार यांच्या उपस्थितीत कुपरेज स्टेडियमवर रंगलेल्या मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या (एमडीएफए) वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याने  आणखीनच चार चाँद लावले.

दमदार… शानदार… अन् संस्मरणीय ठरलेल्या या सोहळ्यात गेल्या वर्षभरात मुंबईतील विविध गटांतील स्पर्धांमध्ये खेळाडूंनी केलेल्या जबरदस्त कामगिरीचे कौतुक करण्यात आले. यावेळी एमडीएफएचे  कर्मचारी, रेफ्री, एमडीएफएच्या अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशनमध्ये नियुक्त झालेल्या व्यक्ती तसेच मुंबईतील सर्व स्टेडियम्सची वर्षानुवर्षे सेवा करणाऱयांना सन्मानित करण्यात आले. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी फुटबॉलपटूंच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचाही गौरव वाढवला. एमडीएफएकडून पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सन्मानित करण्यात आलेल्या सर्वांनाच धनादेश, मानचिन्ह व भेटवस्तू देण्यात आली. हिंदुस्थानचे माजी कर्णधार ब्रुनो कुटीनो, डबल ऑलिम्पियन एस. एस. नारायण, संतोष कश्यप, युसूफ अन्सारी, अखिल अन्सारी, नौशाद मोसा, लक्ष्मण बिस्त, एआयएफएफचे रेफ्री धनराज मोरे, सुजान चौधरी यांच्यासह विफाचे सॉतर वॅझ, एमडीएफएचे अध्यक्ष दिगंबर कांडरकर, सेक्रेटरी उदयन बॅनर्जी, खजिनदार सोधना शेट्टी, सुधाकर राणे, कृष्णा पवले, हेन्री पिकार्डो, अनुप दुबे, सुरेंद्र करकेरा, ए. पी. रॉड्रिक्स, नासीर अन्सारी, सी. के. शेट्टी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा पार पडला.

आता लक्ष महिला फुटबॉल स्पर्धांवर

एमडीएफएच्या कार्यकारिणीची मेहनत व मोलाचा सपोर्ट याच कारणामुळे मुंबईत फुटबॉलला सुवर्णझळाळी मिळू लागली आहे. यामध्ये महानगरपालिका, विफा, एआयएफएफ, विजय पाटील यांचाही तेवढाच वाटा आहे. तसेच खेळाडूंना अव्वल दर्जाची सुविधा उपलब्ध करून देणाऱया जीटी ट्रव्हल्सलाही यावेळी विसरून चालणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी यावेळी कौतुक केले. तसेच भविष्यात महिलांच्या आणखी स्पर्धा खेळवण्यात येतील असा विश्वासही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. तसेच फुटबॉलप्रेमींकडून येणाऱया सूचनांवरही गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे.

खेळांवर प्रेम करा – अक्षयकुमार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अभिनेता अक्षयकुमारच्या हस्ते एलिट डिव्हिजनमधील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तो म्हणाला, मी जुहू येथे राहायला असून कुपरेज स्टेडियम चर्चगेट आहे. मात्र स्टेडियम दूर असूही माझे पाय येथे वळाले ते खेळावर माझे निरतिशय प्रेम असल्यामुळेच. विद्यार्थ्यांनी कोणताही खेळ खेळायला हवा. खेळांवर प्रेम करायला हवे. त्यामुळे त्यांना फिटनेस राखता येईल, असेही अक्षयकुमार आवर्जून म्हणाला.

इंटरनॅशनल फुटबॉल ऍकॅडमीची शोध मोहीम

युरोपमधील इंटरनॅशनल फुटबॉल ऍकॅडमीने मुंबईतून उदयोन्मुख खेळाडूंना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल ऍकॅडमी एसआरएस स्पोर्टस्च्या साथीने मुंबईत ही मोहीम राबवणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात याचा श्रीगणेशा होईल.

गोव्यापेक्षा सरस सोहळा – ब्रुनो कुटीनो

कुपरेज स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेला हा सोहळा पाहून ब्रुनो कुटीनो यांनी एमडीएफएचे कौतुक केले. याप्रसंगी ते म्हणाले, गोव्यातील बक्षीस वितरण सोहळ्यापेक्षा मुंबईतील हा कार्यक्रम भव्यदिव्य ठरलाय. विविध गटांतील विजेत्यांना मोठय़ा व्यासपिठावर सन्मानित करण्यात येत आहे. खरोखरच हे कौतुकास्पद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या