माजी मंत्री सुरेश जैन यांना हायकोर्टाचा दिलासा

607

जळगाव घरकुल घोटाळय़ाप्रकरणी सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी तूर्तास दिलासा दिला. न्यायमूर्ती रणजीत मोरे यांच्या खंडपीठाने जैन यांना पाच लाखांच्या जातमुचलक्यावर वैद्यकीय उपचारासाठी तीन महिन्यांचा जामीन मंजूर केला. सुरेश जैन हे सध्या जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत.

1990 साली जळगावात झालेल्या 29 कोटींच्या घरकुल योजना घोटाळय़ाप्रकरणी सुरेश जैन तसेच राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह 48 जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच अटक करण्याचे आदेश दिले होते. काहींना या शिक्षेतून दिलासा मिळाला. या शिक्षेविरोधात सुरेश जैन यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला व अपिलावर सुनावणी होईपर्यंत शिक्षेला स्थगिती द्यावी अशी मागणीही केली. जैन यांना सैफी रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत. यासाठी त्यांनी हायकोर्टात आज ऍड. आबात पोंडा यांच्या वतीने अर्ज केला. या अर्जावर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने जैन यांचा अर्ज स्वीकारून तीन महिन्यांसाठी तात्पुरता जामीन दिला.

असा झाला घोटाळा

घरकुल योजनेत सुमारे 5 हजार घरांची बांधणी होणार होती, मात्र अवघ्या 1500 घरांची बांधणी करण्यात आली. बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱयांशी हातमिळवणी करून आरोपींनी संगनमताने यामध्ये गैरप्रकार केले असा ठपका ठेवण्यात आला होता. सन 2006 साली तत्कालीन पालिका आयुक्तांनी याबाबत रीतसर तक्रार केली.

आपली प्रतिक्रिया द्या