1 जूनपासून समुद्रात मासेमारीवर बंदी

सामना प्रतिनिधी। मुंबई

मत्स्यप्रेमींना आता सुक्या मासळीची बेगमी करून ठेवावी लागेल. कारण राज्यात 1 जून ते 31 जुलै या काळात यांत्रिक नौकांद्वारे समुद्रातील मासेमारीवर बंदी घोषित केली आहे. त्यामुळे या काळात ताजे फडफडीत मासे बाजारात मिळणार नाहीत. मात्र मत्स्यप्रेमींना खाडीतली मासळी व छोटे मासे मिळण्याची शक्यता आहे. कारण पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱयांना बिगर यांत्रिक नौकांना सूट दिली आहे.

जून व जुलै महिन्यात माशांचा प्रजोत्पादनाचा काळ असतो. या काळात मासे अंडी घालण्याचा काळही असतो. तसेच खराब व वादळी हवामानामुळे मच्छीमारांचा जीव धोक्यात येतो आणि बोटी बुडून जीवित व वित्तहानी होण्याची भीती असते. त्यामुळे राज्यात 1 जून ते 31 जुलै या काळात यांत्रिक नौकांद्वारे समुद्रातील मासेमारीवर बंदी घोषित करण्यात आली आहे. या काळात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱया बिगर यांत्रिक नौकांना हा नियम लागू राहणार नाही असे राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी रविवारी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

नुकसानभरपाई नाही
मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास सरकारकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. ज्या मच्छीमार नौका मासेमारी करताना आढळतील अशा संस्थांनी पाठवलेले अर्ज राष्ट्रीय सहकार निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.