मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात उपकंत्राटदारामुळे दिरंगाई

मुंबई-गोवा महामार्गावरील सुमारे दीडशे किमीच्या पट्टय़ाचे काम शिल्लक आहे. सिंधुदुर्ग जिह्यात काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. पण रत्नागिरी- रायगड जिह्यात उपकंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे कामाला विलंब झाल्याची कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली. पण आता मिशन मोडवर या महामार्गाचे काम सुरू आहे. पुढील गणेशोत्सवापर्यंत मुंबई- गोवा महामार्ग चकाचक होईल, असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला.

‘मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्वास 2025 चा मुहूर्त’ असे वृत्त दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वृत्ताची दखल घेत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पावसाळय़ानंतर वेगाने सुरू होईल असे सांगितले. मध्यंतरी मी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन या महामार्गाची पाहणी केली आहे. त्यामुळेच डिसेंबर 2023 मध्ये मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल हे मी विधानसभेत पूर्ण ताकदीने सांगितले आहे. सर्व लोकप्रतिनिधींना सहकार्याचे आवाहन  सभागृहातच केले आहे.

होल्डिंग कपॅसिटी आवश्यक

सिंधुदुर्ग जिह्याच्या वेशीपासून राजापूरपर्यंत चांगला रस्ता आहे. या रस्त्याच्या कामात उपकंत्राट दिले नव्हते. उपकंत्राटदाराची काम करण्याची आर्थिक क्षमता (होल्डिंग कपॅसिटी) पाहिजे  अर्धा किमी रस्त्याचे काम केले मग थांबवले असे चालत नाही.  रत्नागिरी व रायगड जिह्यात मुख्य कंत्राटदाराकडून उपकंत्राट घेतले. हेही विलंबांमागील एक कारण असल्याचे ते म्हणाले.

कशेडी घाटाची एक लेन डिसेंबरमध्ये

कोकणच्या दृष्टिकोनातून या महामार्गाचे काम महत्त्वाचे आहे.  म्हणूनच सर्व लोकप्रतिनिधींना सभागृहातच सहकार्याचे आवाहन केले. इंदापूरचे काम करायला लवकरच घेणार आहे. चिपळूणमध्येही काम करायला घेतले आहे. पाऊस थांबल्यावर क्राँक्रीटीकरण सुरू होईल. रत्नागिरीच्या घाटात दरड कोसळते. या भागात वरच्या बाजूला सहा-सात व खाली पन्नास ते साठ घरे आहेत. या लोकांचे नवरात्रीनंतर स्थलांतर केले जाईल.  स्थलांतर झाल्यावर ताकदीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. खर्चही दिला जाईल. रुंदीकरणाचे कामही करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व करायला लागणारा कालावधी लक्षात घेतला तर एक-दीड वर्षाचा कालावधी लागेल.  दीडशे किमीचा भाग करायचा शिल्लक आहे. कशेडी घाटाची एक लेन डिसेंबरमध्ये सुरू होईल. कोकणातील मुसळधार पाऊस व इतर सर्व कामे गृहीत धरून डिसेंबर 2023 मध्ये काम पूर्ण होईल असे आपण सांगितले आहे. पण पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी ही कामे पूर्ण करायची आहेत, असे ते म्हणाले.