पाली येथे पावणेतीन लाखाची दारू पकडली

मुंबई गोवा महामार्गावर गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने दारूची वाहतूक करणारी कार पकडून २ लाख ८२ हजार रूपयांची दारू जप्त केली.

पाली येथे मारुती झेन एम एच 02 जे ए 3749 भरधाव वेगाने येत असलेली दिसून आली. ही कार थांबवून त्याची तपासणी केली असता यामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचा मोठा साठा मिळून आला. यामध्ये वाहनासह 2 लाख ८२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर गुन्ह्यात वाहनचालक वृषाल रामभाऊ चव्हाण (रा वैभववाडी. जि सिंधुदुर्ग) यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपअधीक्षक श्री व्ही.व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी धडक कारवाया केल्या आहेत. त्याच अनुषंगाने वाहन तपासणी करत असताना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने पाली येथे सदर वाहन गोवा बनावटीच्या मद्यासह ताब्यात घेतले. यापुढेही गोवा बनावटीच्या मद्यविक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे उपअधीक्षक वैद्य यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या