मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे 38 टक्के काम रखडले! इंदापूर ते झारापदरम्यान 148 किमीचे काम अद्याप बाकी

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून 38 टक्के काम अद्याप रखडले आहे. इंदापूर ते झाराप या 355 किमी टप्प्यातील 148 किमी रस्त्याचे चौपदरीकरण अपूर्ण असून या कामाच्या दिरंगाईसाठी प्रशासनाने कोविड व मुसळधार पावसाचे कारण पुढे केले आहे. तसे प्रतिज्ञापत्रच बांधकाम विभागाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे.

कोकणात जाण्यासाठी सोयिस्कर ठरणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून अनेक वर्षे उलटूनही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 वर पडलेल्या खडय़ांमुळे अॅड. ओवीस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या महामार्गाचे काम लटकल्याने वाहन चालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी अॅड. पेचकर यांनी केली आहे. या याचिकेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर श्रीकांत बांगर यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, इंदापूर-चिपळूण-हातखंबा-झाराप-पत्रादेवी या 471 किमी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 10 टप्प्यांत होणार असून इंदापूर ते झाराप या 355 किमीपैकी 206 किमीचे काम पूर्ण झाले आहे. 62 टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या या महामार्गावरून सुरळीत वाहतूक होत आहे उर्वरित काम प्रगतिपथावर असून 30 डिसेंबर 2022 पर्यंत ते पूर्ण होणार आहे.

महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाही

महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहन चालकांकडून टोल आकारणार नाही असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय महामार्गावर खड्डे नसल्याचा दावा प्रशासनाने केला असून वशिष्ठी नदीवरील नवीन पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. या पुलावरील केवळ दोन लेन वाहन चालकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या