मुंबई-गोवा चौपदीकरणाचे काम रखडले; महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले

1822

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाच्या प्रकल्पातील 14 मोठ्या पुलांच्या कामांसह महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढून दरवर्षी शेकडो लोकांना नाहक प्राण गमवावे लागत असल्याचे राज्य सरकारने मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तरात मान्य केले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्णावस्थेत असल्याबद्दल भास्कर जाधव, राजन साळवी आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी लेखी उत्तरात सविस्तर माहिती दिली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पनवेल त इंदापूर या 84 किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असून या चौपदरीकरणाच्या कामाची मुदत जून 2014 पर्यंत होती, पण 2016 पर्यंत पर्यावरण व वन विभागाच्या परवनग्या तसेच भूसंपादनातील काही अडचणींमुळे प्रकल्पास विलंब होऊन प्रकल्प रखडला होता. मात्र 2016 दरम्यान परवानग्या मिळाल्यानंतर कामाला तसेच भूसंपादनाच्या कामाला वेग मिळाला. प्रकल्पाला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारकडून 540 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यानंतर मार्च 2017 पासून या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार 79 टक्के काम झाल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्याची योजना

पनवेल ते इंदापूर या टप्प्यात एकूण 27 ठिकाणी अंडर पासेस असून वाशी नाका व इतर जोडरस्त्यावर जंक्शन विकास करण्यात येत आहे. तर इंदापूर ते झाराप या मार्गावरील चौपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादनात झालेला विलंब, तसेच स्थानिक जनतेच्या विविध अधिकच्या मागण्या वन जमीन, कोकण रेल्वे ओलांडण्यासाठी लागणारी परवानगी अशा कारणांमुळे विलंब झाला, पण जून 2020 पर्यंत 250 किमी व उर्वरित 366 किमी मार्गाचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.

अपघात कमी करण्यासाठी

या महामार्गावर अपघात होऊ नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा गटार व्यवस्था व सर्व्हिस रोडचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर भुयारी मार्गाच्या प्रस्तावाला विशेष मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या