मुंबई-गोवा महामार्गावर 6 लाखांची गोवा बनावटीची दारु पकडली, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील पन्हाळे येथे उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक पकडली. या कारवाईत 6 लाख रुपयांची गोवा बनावटीची दारु आणि 3 लाख 75 हजार रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महसूलाचे नुकसान आणि मद्यपांच्या आरोग्याची हानी होऊ नये याकरीता परराज्यातून येणाऱ्या बेकायदेशीर दारुवर कठोर कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आलो आहे. राजापूर तालुक्यातील पन्हाळे येथे उत्पादन शुल्क विभागाचे पथक तपासणी करत असताना एका चारचाकी टेम्पोतून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. गाडीमध्ये गोल्डन एस व्हिस्कीचे 750 मिलीचे 60 बॉक्स, गोल्ड अँण्ड ब्लॅक रमचे 750 मिलीचे 40 बॉक्स असा एकूण 6 लाख रुपयांचा दारूसाठा आणि 3 लाख 75 हजार रुपये किंमतीचा टॅम्पो जप्त करण्यात आला. वाहनचालक संतोष गंगाराम खरात (30)रा. कुडाळ याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निरिक्षक अमित पाडाळकर, दुय्यम निरिक्षक सचिन यादव, मानस पवार, वैभव सोनावणे, मलिक धोत्रे, सुजल घुडे यांनी केली