उद्यानांतून संगीत सोहळा

2530

हिंदुस्थानी संगीत घराघरात पोहोचावे, हिंदुस्थानी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी टेंडर रुट्स ऍकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने 19 जानेवारीला पहिल्यांदाच ‘मुंबई ग्रीन रागा सोहळा’ रंगणार आहे. एकाच दिवशी आणि एकाच वेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सतरा विविध उद्यानात 35 मुख्य कलाकार आणि त्यांना 50 कलाकारांची साथ लाभणार असून त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

हिंदुस्थानी कलाकारांना ओळख मिळावी, त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला आहे. आज शास्त्रीय संगीत शिकणारे कलाकार बरेच आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा प्रयत्न आहे. मुंबईत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. आज अनेक उद्यानात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांची गर्दी होते. अशावेळी हिरव्यागार आणि प्रसन्न वातावरणात लोकांना शास्त्रीय संगीत कानावर पडले तर श्रोत्यांचा उत्साह वाढेल. त्यामुळे सकाळी 7 ते 9 या वेळेत मुंबईकरांनी या ग्रीन रागाला प्रोत्साहन द्यावे. यामध्ये अभिलाष देव, श्रीपाद लिंबेकर, रमाकांत गायकवाड, सायुरी मिरगल, रामेश्वर डांगे, कल्याणी जोगळेकर, भाग्यश्री पांचाळ, सुनीता भट, कस्तुरी देशपांडे, आदित्य खांडवे, प्रियांका माथुर, सौरभ नाईक, केदार केळकर, निर्भय सक्सेना, भाग्येश मराठे, सुजेश मेनन आणि मुग्धा गावकर हे कलाकार शास्त्रीय गायन करणार आहेत.

हा सोहळा मलबार हिल-हँगिंग गार्डन, ब्रीच कॅण्डी – टाटा गार्डन, वरळी -शंकराचार्य उद्यान, लोअर परेल – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यान, शिवाजी पार्क-वीर बाजीप्रभू उद्यान, वांद्रे पश्चिम जॉगर्स पार्क कार्टर रोड, वांद्रे पश्चिम- राव साहेब पटवर्धन पार्क, सांताक्रुझ पश्चिम- लायन जुहू पार्क, मालाड पश्चिम – माईण्डस्पेस गार्डन, जोगेश्वरी पूर्व – शिल्पाग्राम उद्यान, बोरीवली पश्चिम – स्वातंत्रवीर सावरकर उद्यान, कांदिवली (पूर्व) – ड्रीम पार्क गार्डन, दहिसर (पूर्व) – श्री मारुती मैदान, किशोर कुमार गार्डन , मुलुंड – सी.डी. देशमुख उद्यान, माझगाव -सेंट जोसेफ बापटिस्टा गार्डन, ऍम्पीथिएटर – वांद्रे फोर्ट या विविध उद्यानात मुंबईकरांना त्याचा लाभ घेता येणार आहे. बॅनियन ट्री या कंपनीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी 9223231359, 9323119381 या क्रमांकावर संपर्क साधावा.

आपली प्रतिक्रिया द्या