हार्बर लवकरच गोरेगावपर्यंत धावणार

मुंबईः सध्या हार्बर मार्गावरून सीएसटी ते अंधेरीपर्यंत जाता येते. लवकरच विस्तारीकरणात हार्बरची झेप गोरेगावपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पात अडथळा ठरलेल्या दोन घरांचा प्रश्न उच्च न्यायालयात मार्गी लागला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हार्बरच्या विस्ताराचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. हार्बर मार्गावरील ओशिवरा, गोरेगाव स्थानकांचे बांधकामही अंतिम टप्यात आले आहे. दरम्यान, थेट गोरेगावपर्यंत विस्तार करण्यासाठी जोगेश्वरीतील पश्चिमेला असलेला फलाट आड येत असून रविवार १९ फेब्रुवारी रोजी तो पाडण्यात येणार आहे. हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणामुळे आता एकाच फलाटावर जोगेश्वरीवासीयांची मदार राहणार आहे. हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी पश्चिमेकडील फलाट या रविवारी (१९ फेब्रुवारी) पाडला जाईल. त्यासाठीच्या मेगाब्लॉकला मंजुरी मिळाली आहे. दोन टप्यांत हे काम होणार आहे. दुसऱया रविवारी (२६ फेब्रुवारी) कट ऍण्ड कनेक्शन अंतर्गत रेल्वे मार्गांची रचना बदलली जाणार असल्याचे एमआरव्हीसीचे जनसंपर्क अधिकारी प्रभात रंजन यांनी सांगितले.