वेश्याव्यवसायातील महिलांची सुधारगृहातून सुटका करण्यास हायकोर्टाचा नकार

28
mumbai-highcourt

सामना प्रतिनिधी। मुंबई

सुधारगृहातून आपली सुटका व्हावी यासाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या वारांगनांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास बुधवारी नकार दिला. या महिला मूळच्या परदेशातील असून हिंदुस्थानात वास्तव्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे सुधारगृहातून त्यांची सुटका केल्यास पुन्हा वेश्याव्यवसायात या महिला जाणार नाहीत अशी खात्रीही देता येत नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी याचिका फेटाळून लावली.

नेपाळ आणि बांगलादेश येथील दोन महिलांची सांगली येथील कुंटणखान्यातून पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात सुटका केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी आशा किरण महिला शासकीय निवासस्थानी या सुधारगृहात करण्यात आली. येथून आपली सुटका व्हावी यासाठी दोन विविध याचिका सातारा येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्या. आपल्या बहिणीला सात वर्षांची मुलगी असून तिची देखभाल करण्यासाठी कोणीही नाही अशी मागणी याचिकेत करण्यात आली तर दुसऱया याचिकेत सदर महिलेची सुटका न केल्यास तिच्या नोकरीवर गदा येईल, शिवाय या महिला सज्ञान असून त्यांना त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असे म्हटले आहे. सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने या महिलांनी हायकोर्टात अपील केले. या दोघींची सुटका केल्यास भविष्यात पुन्हा वेश्याव्यवसाय करणार नाहीत याची कोणतीही हमी देता येत नाही. शिवाय सुधारगृहात त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाईल व पैसे कमावण्याचा स्रोतही येथे उपलब्ध आहे असे आदेश सत्र न्यायालयाने दिले होते. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी सत्र न्यायालयाचे आदेश कायम ठेवत याचिकाकर्त्याना दिलासा देण्यास नकार दिला.

आपली प्रतिक्रिया द्या