
नगर जिल्ह्यातील नेवासा येथील शिवसेनेचे पदाधिकारी अण्णा लष्करे यांची राजकीय वैमनस्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात बेछुट गोळीबार करून हत्या केली होती. या हत्येप्रकरणातील सहापैकी पाच जणांची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. जी. अवचट व न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी कायम ठेवली. एका आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणातील सहाही आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथील तिसरे सत्र न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर अन्य एकाला ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते. खंडपीठाने सय्यद सर्फराज अब्दुल कदर, शेख एजाज उर्फ मुन्ना जहागीरदार, शेख जावेद शेख शेरू उर्फ पेंटर, मुनीर उर्फ मुन्ना निझाम पठाण व शेख राजू उर्फ राजू जहागीरदार यांची जन्मठेप खंडपीठाने कायम केली. तर शेख मुस्तफा अहमद शेख गुलाम रसूल यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील प्रशांत गोपाळराव बोराडे यांनी बाजू मांडली.
नगर नाक्याजवळ अण्णा लष्करे यांची सोळा ते सतरा गोळ्या झाडून 18 मे 2021 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवशी अण्णा ऊर्फ सुनील लष्करे, पत्नी पूजा, मुली प्रिया, वैष्णवी, लहान मुलगा आणि शेजारी राहणारा मुलगा मनोज धोत्रे हे सर्व जण नेवासा येथून छत्रपती संभाजीनगर येथे खरेदीसाठी निघाले होते. दरम्यान, त्यांच्या कारच्या मागावर मारेकरी होते. त्याअगोदर लष्करे यांच्यासोबत खडका फाट्यावर पेट्रोल पंपावर मुन्ना जहागीरदार आणि मुनीर पठाण यांनी भांडण केले होते. पुढे नगर नाक्याजवळ एका नॅनो कारने लष्करे यांच्या वाहनाला धडक दिली. लष्करेंनी त्याला जाब विचारण्यासाठी कार थांबवली. याच वेळात दोन दुचाकींवर सहा जण आले आणि त्यापैकी तिघांनी अण्णांचे हात धरले तर उर्वरित तिघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
पूजाने एका हल्लेखोराला मज्जाव करत असताना दोघांमध्ये झटापट झाली आणि त्याचा मोबाइल खाली पडला. गोळ्या झाडल्यानंतर सर्वच आरोपी फरार झाले. या प्रकरणात एकूण 38 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी पूजा लष्करे आणि मनोज धोत्रे यांनी आरोपींना ओळखले. आरोपी राहात असलेल्या भागातच पूजा यांचे विवाहपूर्व आयुष्यातील वास्तव्य राहिल्यामुळे त्यांनी भाषा इतर राहणीमानावरून आरोपींना ओळखल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.