मीरा बेन यांचे आत्मचरित्र मराठीत प्रसिद्ध होणार, उच्च न्यायालयाने दिली मुभा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ब्रिटिश शिष्या मीरा बेन यांचे आत्मचरित्र मराठीमध्ये अनुवादित करून प्रसिद्ध करण्यास उच्च न्यायालयाने 83 वर्षीय वकील अनिलकुमार कारखानीस यांना परवानगी दिली आहे. कारखानीस यांनी ‘द स्पिरीट पिलग्रिमेज’ हे आत्मचरित्र मराठीमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी मागितली होती.

कुठल्याही व्यावसायिक लाभासाठी नव्हे तर जनहिताचा विचार करून ‘द स्पिरीट पिलग्रिमेज’ हे आत्मचरित्र मराठीत प्रकाशित करण्यास मुभा द्या, अशी विनंती कारखानीस यांनी केली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी निर्णय दिला. कॉपीराईट कायद्याचे कलम 32 व कॉपीराईट नियमावलीच्या नियम 32 अन्वये आत्मचरित्राच्या प्रसिद्धीसाठी परवानगी देण्यास काहीच हरकत नाही, असे न्यायमूर्ती चितळे यांनी निकालपत्रात म्हटले आहे. हिंदुस्थानात 1960 मध्ये ओरिएंट लाँगमॅन प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीने मीरा बेन यांचे आत्मचरित्र प्रकाशित केले होते. मीरा बेन यांचे 20 जुलै 1982 रोजी निधन झाले. सध्या त्यांच्या ‘द स्पिरीट पिलग्रिमेज’ या आत्मचरित्राच्या मूळ प्रकाशकाचा ठावठिकाणा लागत नसल्याने कारखानीस यांनी आत्मचरित्राच्या मराठी अनुवादासाठी उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.