भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण, गौतम नवलखा यांना तूर्तास दिलासा

mumbai-highcourt

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा यांच्या विरोधात सादर करण्यात आलेले पुरावे पाहता प्रथमदर्शनी या आरोपात कोणतेही तथ्य आढळून येत नाही तसेच यात गोपनीय असे काहीच नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्तीं रणजित मोरे आणि भारती डांगरे यांनी बुधवारी नवलखा यांना तूर्तास दिलासा दिला. 18 जूनपर्यंत नवलखा यांना अटक करू नये असे पुणे पोलिसांना बजावत न्यायमूर्तींनी पुढील सुनावणीवेळी तपास अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले.

भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून गौतम नवलखा यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी ऍड. युग चौधरी यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. नवलखा हे पत्रकार व लेखक आहेत. त्यांनी अनेकदा नक्षल आणि सरकार यांच्यात वाटाघाटी घडवून आणल्या आहेत. असे असतानाही त्यांच्यावर शहरी नक्षलवाद पसरवल्याचा आरोप केला जात आहे, असा जोरदार युक्तिवाद नवलखा यांचे वकील चौधरी यांनी आज केला. त्यावेळी सरकारच्या वतीने ऍड. अरुणा पै यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, नवलखा यांच्याविरोधात सरकारकडे सबळ पुरावे आहेत. त्याबाबतचा सीलबंद अहवाल त्यांनी न्यायालयात सादर केला. न्यायमूर्तींनी हा अहवाल पाहिल्यानंतर यात गोपनीय असे काहीच दिसून येत नाही असे स्पष्ट केल्यामुळे तपास अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती घेण्यासाठी वेळ हवा असल्याची विनंती सरकारी वकिलांनी खंडपीठाकडे केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत 18 जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या