चिदंबरम यांच्या घराचे वासे फिरले, आयएनएक्स मीडियापाठोपाठ 63 मून्स घोटाळाही भोवणार

779
p chidambaram

काँग्रेस नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची कायद्याच्या कचाटय़ातून लवकर सुटका होण्याची चिन्हे नाहीत. आयएनएक्स मीडियापाठोपाठ 63 मून्स कंपनीतील घोटाळ्याने चिदंबरम यांच्या संकटात भर टाकली आहे. या प्रकरणी 15 ऑक्टोबरला हजर राहा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्या घराचे वासे फिरल्याचे स्पष्ट होत आहे.

63 मून्स कंपनीतील जवळपास 10 हजार कोटींच्या घोटाळ्यात चिदंबरम यांच्यासह के. पी. कृष्णन आणि रमेश अभिषेक या सनदी अधिकाऱयांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील दाव्याची दखल घेत न्यायालयाने चिदंबरम यांच्यासह कृष्णन व अभिषेक यांना 15 ऑक्टोबरला न्यायालयापुढे हजर राहण्याचा आदेश दिला आहे, मात्र आपल्यावरील कारवाई चुकीची असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे.

एकीकडे आयएनएक्स मीडिया घोटाळ्यामुळे चिदंबरम हे ईडी आणि सीबीआयच्या कचाटय़ात सापडले आहेत. त्यापाठोपाठ आता 63 मून्स कंपनीतील घोटाळा चिदंबरम यांच्या संकटात मोठी भर टाकणार आहे.

कागदपत्रांसाठी उच्च न्यायालयात अर्ज
चिदंबरम यांनी आरोपासंबंधीची कागदपत्रे मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. माझ्यावरील आरोपासंबंधीची कागदपत्रे मला मिळालेली नाहीत. मला संबंधित कागदपत्रे मिळावीत अशी विनंती चिदंबरम यांनी न्यायालयाला केली आहे, तर आरोपींना संबंधित कागदपत्रे दिल्याचा दावा 63 मून्स कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या