अभिनेता सोनू सूदला हायकोर्टाचा दणका, पालिकेविरोधातील याचिका फेटाळली

बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याची अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिके विरोधातील याचिका हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. हायकोर्टाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सोनू सूद याच्या वकिलाकडून करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे सोनू सूद याला दिवाणी न्यायालयाला पाठोपाठ हायकोर्टाकडूनही दणका बसला आहे.

अभिनेता सोनू सूद याने निवासी इमारतीत सुरू केलेले हॉटेल बेकायदा असून हॉटेल सुरू करण्याबाबत त्याने पालिकेकडून कोणतीच परवानगी घेतलेली नाही. असे पालिकेने स्पष्ट म्हटले होते. एवढेच काय तर पालिकेने त्याच्या या अनधिकृत हॉटेलवर दोनवेळा कारवाई देखील केली आहे त्यामुळे पालिका त्रास देत असल्याचा सोनूचा दावा धादांत खोटा आहे, असे प्रतिज्ञापत्र मुंबई महापालिकेने याआधी हायकोर्टात सादर केले होते.

या प्रकरणी पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने पालिकेने सोनू सूदला नोटीस पाठवली होती. पालिकेच्या नोटीसीविरोधात सोनूने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र दिवाणी न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावल्याने सोनूने अॅड. डी. पी. सिंग यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेप्रकरणी मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्र दाखल केले.

या प्रतिज्ञापत्रात पालिकेने असे म्हटले आहे की, ‘सोनू सूदने निवासी इमारतीत पालिकेची कोणतीही परवानगी न घेता हॉटेल सुरू केले आहे. त्यासाठी निवासी इमारतीत बदल करण्यात आले आहेत. इमारतीत फेरफार केल्यामुळे दुर्घटना घडून तेथील ग्राहकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.’

आपली प्रतिक्रिया द्या