‘पेव्हर ब्लॉक’ ही मोठी समस्या, फुटपाथ चालण्यायोग्य बनवा! हायकोर्टाचे पालिकेला निर्देश

फुटपाथवरील अतिक्रमण तसेच अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींची होत असलेली गैरसोय लक्षात घेत उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई महापालिका प्रशासनाचे कान उपटले. शहरातील फुटपाथ चालण्यायोग्य बनवा, विनावापर असलेल्या फुटपाथवर दिवसरात्र केली जाणारी पार्किंग तसेच अन्य प्रकारचे अतिक्रमण वेळीच रोखा, असे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले. पेव्हर ब्लॉक ही एक मोठी समस्या आहे. पेव्हर ब्लॉक अधूनमधून उखडतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लोक अडखळतात, असे मत नोंदवत संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोणती पावले उचलणार ते प्रतिज्ञापत्राद्वारे कळवण्यास सांगितले.

बोरिवली (पूर्व) येथील पंकज अग्रवाल आणि गोपालकृष्ण अग्रवाल या दोन दुकानमालकांनी त्यांच्या दुकानांसमोर अनेक अनधिकृत स्टॉल्स उभी राहिल्याची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत न्यायालयाने स्युमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी खंडपीठाने विनापरवाना फेरीवाल्यांचे अतिक्रमण वेळीच हटवा आणि फुटपाथ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींसह सर्व पादचाऱयांसाठी चालण्यायोग्य आहेत का, याची खात्री करा, असे निर्देश पालिकेला दिले. त्यावर पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील एस.यू. कामदार यांनी बाजू मांडली. शहरातील अनेक विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. किंबहुना विशिष्ट हॉकिंग झोनची निश्चिती करण्यासह अतिक्रमणाची समस्या सोडविण्यासाठी 2014च्या फेरीवाला कायद्या अंतर्गत टाऊन व्हेंडिंग कमिटी स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून ही पावले उचलत आहे, असे ऍड. कामदार यांनी कळवले. त्याची दखल घेतानाच पेव्हर ब्लॉक उखडून फुटपाथची होत असलेली दुर्दशा तसेच वापर होत नसलेल्या फुटपाथवर दिवस-रात्र केले जाणारे बेकायदा पार्ंकग आदी समस्या सोडविण्यासाठीही गांभीर्याने विचार करण्याचे न्यायालयाने पालिकेला बजावले. याबाबत 1 मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश पालिकेला दिले. या प्रकरणी 3 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.

न्यायालय काय म्हणाले…

– आम्ही पालिकेच्या व्यवस्थेत हस्तक्षेप करत नाही. मात्र पादचाऱयांना चालता येण्याजोगे फूटपाथ उपलब्ध आहेत याची खात्री करणे आवश्यकच आहे.
– फुटपाथवर अधिकृत किंवा अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे फुटपाथ अरुंद होऊन पादचाऱयांना अडचणी येतात. बॉम्बे जिमखानाजवळील रस्ता याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
– जिथे फुटपाथ नसतात तिथे विशिष्ट चिन्ह असावे. जेणेकरून लोकांना कुठे चालायचे आहे हे कळेल. चिन्ह तसेच क्रॉसिंग स्पष्ट असले पाहिजे.
– पेव्हर ब्लॉकची मोठी समस्या आहे. अधूनमधून पेव्हर ब्लॉक बाहेर पडतात, त्याचा पादचाऱयांना त्रास होतो. यामागे नेमकी तांत्रिक अडचण काय आहे, याकडे अभियांत्रिकी विभागाने लक्ष दिले पाहिजे.
– सर्व समस्या एकाच वेळेस सुटणार नाहीत याची कल्पना आहे. तथापि, प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरवून समस्या सोडवाव्यात.