आयपीएलसाठी वानखेडेलाअतिरिक्त पाणी मिळणार की नाही?

18

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्याच्या ग्रामीण भागात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही आयपीएलसारख्या क्रिकेट स्पर्धेसाठी वानखेडे स्टेडियमला मुंबई महापालिका दरवेळेस लाखो लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करते. गेल्या वर्षी या मुद्दय़ावर प्रचंड गदारोळ झाल्याने पालिकेने हा पाणीपुरवठा तत्काळ थांबवला. परंतु यंदाच्या आयपीएल हंगामात वानखेडे स्टेडियमला हे अतिरिक्त पाणी मिळणार की नाही याबाबत संभ्रम असतानाच मुंबई उच्च न्यायालयानेदेखील आयपीएलसाठी तुम्ही वानखेडेला अतिरिक्त पाणी पुरविणार की गेल्या वर्षीप्रमाणे पाणी न पुरविण्याचा निर्णय घेणार, असा सवाल करून मुंबई महापालिकेला कोंडीत पकडले आहे. याबाबतची माहिती येत्या ६ एप्रिल रोजी सादर करा, असे आदेशही खंडपीठाने पालिका प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई महापालिका जादा पाणीपुरवठा करीत असल्याने एका संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने मागील तीन वर्षांत कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त पाणीपुरवठा वानखेडे स्टेडिअमला केला नसल्याचे खंडपीठाला सांगितले. पालिका आपल्या निर्णयावर ठाम राहून यंदाही वानखेडे स्टेडिअमला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे टाळणार का, असा सवाल न्यायमूर्तींनी त्या वेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या