२५ आठवड्यांच्या गर्भवतीस गर्भपात करण्याची हायकोर्टाची परवानगी

27
mumbai bombay-highcourt

सामना ऑनलाईन । मुंबई

जन्मानंतर अपत्य जगण्याची कमी शक्यता व अविकसित भ्रूणमुळे मातेच्या जीवास वाढता धोका लक्षात घेऊन एका गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. सदर महिला २५ आठवड्यांची गर्भवती असून उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या महिलेला दिलासा मिळाला आहे.

कायद्यानुसार २० आठवड्यांनंतर गर्भवती महिलेस गर्भपात करता येत नाही, परंतु तिच्या उदरात वाढत असलेल्या भूणाचा विकास होत नसल्याची माहिती २२ आठवड्यांनंतर या महिलेसह डॉक्टरांना मिळाली व सदर २८ वर्षीय महिलेने गर्भपात करण्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गेल्या आठवडय़ात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जेजे रुग्णालयाच्या पथकाला यासंदर्भात सदर महिलेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जेजे रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने सदर महिलेच्या भ्रूणात दोष असल्याचे तसेच प्रसूतीनंतर या महिलेच्या जीवाला धोका असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आज आणून दिले.

न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सदर अहवाल नजरेखालून घातल्यानंतर महिलेला गर्भपात करण्याची मुभा दिली. गर्भपाताची परवानगी नाकारण्याचा निर्णय घेणे आमच्यासाठी अतिशय कठीण जात असल्याचे सांगत खंडपीठाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिला व महिलेला गर्भपातास परवानगी दिली. सदर महिलेचा गर्भपात उद्या मंगळवारी करण्यात यावा, असा आदेशही खंडपीठाने दिला.

आपली प्रतिक्रिया द्या