खबरदारी, विश्वासामुळेच मी ‘कोरोनोमुक्त’ झाले, मुंबई हॉस्पिटलमधील परिचारिकेची कोरोनावर मात

‘माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा खरं तर मोठा धक्काच बसला. काहीशी भितीही वाटली. मात्र पहिल्यापासून घेतलेली वैद्यकीय खबरदारी, सहायक उपचार आणि स्वत:वरचा, देवावरचा प्रचंड विश्वास यामुळेच मी कोरोनामुक्त झाले,’ अशी भावना मुंबई हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करणार्‍या आणि कोरोनामुक्त झालेल्या रूपाली राजे यांनी व्यक्त केली.

चेंबूर पश्चिमच्या सुखसागर को-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहणार्‍या रूपाली अतुल राजे (39) या गेल्या अठरा वर्षांपासून नर्स म्हणून वैद्यकीय क्षेत्रात आपली सेवा बजावत आहे. १७ एप्रिल रोजी मुंबई हॉस्पिटलमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर रुग्णालयातील 40 जणांच्या स्टाफच्या चाचणीत पाच परिचारिकाही कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या. यामध्ये 19 एप्रिल रोजी रिपोर्ट आल्यानंतर रूपाली यांच्यावर मुंबई हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी रूपाली यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. तरीदेखील व्हिटॅमिन, मल्टीव्हिटॅमिनचा डोस सुरू होता. रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेली सुविधा, कुटुंबीय-नातेवाईकांकडून मिळालेला धीर आणि विशेष म्हणजे माझा देवावर असणारा प्रचंड विश्वास यामुळेच मी कोरोनामुक्त झाले अशी भावना रूपाली राजे यांनी व्यक्त केली.

पुन्हा आरोग्य सेवेचे कर्तव्य बजावणार
चेंबूरच्या सुखसागर सोसायटीत राहणार्‍या रूपाली यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे सोसायटीतील सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे आज जेव्हा त्या कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या तेव्हा सोसायटीतील अनेक जण त्यांचे स्वागत करण्यासाठी खाली आले होते. त्यांनी सोसायटीत प्रवेश करताच सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य वैद्यकीय खबरदारी, सोशल डिस्टन्स ठेवून आत्मविश्वासने आपण कोरोनावर मात करू शकतो असे त्या यावेळी म्हणाल्या. चौदा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामावर जाऊन आपले कर्तव्य बजावणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या