देशात सर्वाधिक महागडी घरे मुंबईत!

24

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही प्रमुख निवासी मालमत्तांची सर्वात महागडी बाजारपेठ ठरली आहे. 2019च्या पहिल्या तिमाहीत प्रमुख मालमत्तेची किंमत 64,649 रुपये प्रति चौरस फूट होती. 2018 साली प्रमुख मालमत्तांच्या किमती 64,432 प्रति चौरस फूट एवढी होती. त्या तुलनेत या किमतीत 0.3 टक्के वाढ झालेली दिसली. नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्टमधून ही माहिती पुढे आली आहे.

जगभरातील विविध शहरांतील प्रमुख मालमत्ता बाजारपेठांमधील किमतींत घडत गेलेल्या बदलांची नोंद करण्यावर या अहवालाचा भर होता. हाँगकॉंग हे शहर पुन्हा एकदा राहत्या जागांची जगातील सर्वात महागडी बाजारपेठ ठरली आहे. 2018मध्ये इथल्या प्रमुख मालमत्तांची किंमत सरासरी 4,251 अमेरिकन डॉलर्स प्रति चौरस फूट इतकी होती. या यादीत लंडन दुसऱया तर न्यूयॉर्क तिसऱया क्रमांकावर आहे. हिंदुस्थानात निवासी मालमत्तांच्या किमती मुंबईत सर्वाधिक आहेत.

दिल्लीच्या बाबतीत बोलायचे तर 2019च्या पहिल्या तिमाहीत 4.4 टक्के इतकी सर्वाधिक भाववाढ झाल्याचे दिसले. दिल्लीतील प्रमुख मालमत्तांची किंमत 33,507 रुपये प्रति चौरस फूट इतकी होती. बंगळुरूच्या प्रमुख मालमत्तांच्या सरासरी किमतींमध्ये 2018 साली 0.8 टक्के वाढ झाली व त्या 19,296 रुपये प्रति चौरस फूट इतकी होती. 2019च्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारीननुसार बंगळुरूमधील प्रमुख मालमत्तांची किंमत 19,477 रुपये प्रति चौरस फूट इतकी होती.

2019च्या दुसऱया सहामाहीत आलिशान मालमत्तांसह सर्व श्रेणींमधील जागांच्या किमतींमध्ये किरकोळ वाढ होऊ शकते. ऑटिटय़ूड सर्वेक्षणानुसार देशातील 14 टक्के श्रीमंतांकडून 2019 साली नवे घर विकत घेतले जाण्याची शक्यता आहे. – शिशिर बैजल, अध्यक्ष, नाईट फ्रँक

आपली प्रतिक्रिया द्या