रक्तसाठय़ामध्ये पालिकेचे नायर रुग्णालय नंबर वन

156

रुग्णांसाठी जीवदान ठरणाऱया रक्ताचा साठा करण्यामध्ये मुंबई महापालिकेचे बा. य. ल. नायर रुग्णालय आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. 11 नोव्हेंबर रोजी ई-रक्तकोश पोर्टलवर उपलब्ध असलेल्या रक्तगटाच्या उपलब्धतेची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार नायर रुग्णालयाच्या रक्तपेढीत सर्वाधिक 97 युनिटस् रक्त उपलब्ध असल्याचे दिसून आले, तर केईएम रुग्णालयात 31, जे.जे. रुग्णालयात 27 युनिटस् एवढे रक्त उपलब्ध होते.

रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे वर्षाला हजार रुग्णांचे प्राण वाचतात. त्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्वच रुग्णालये वेगवेगळय़ा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नेहमी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त रक्तसाठा आपल्या रक्तपेढीत करतात. सदर रक्त गरजेनुसार रुग्णांना उपलब्ध करून दिले जाते. 11 नोव्हेंबर रोजीच्या ई-रक्तकोश पोर्टलवरील माहितीनुसार नायर रुग्णालयाच्या रक्तपेढीत सात रक्तगटांचे 97 युनिटस् उपलब्ध होते. त्यामध्ये बी पॉझिटिव्ह 26 युनिटस्, ए पॉाझिटिव्ह 17 युनिटस्, ओ पॉझिटिव्ह 37, एबी पॉझिटिव्ह 1, ए निगेटिव्ह 8, एबी पॉझिटिव्ह 6, बी निगेटिव्ह 2 युनिटस् असे रक्त उपलब्ध होते. त्याखालोखाल केईएममध्ये 31, जे.जे. मध्ये 27, सायन 6, राजावाडी 5, सेंट जॉर्ज 4, भाभा 2 युनिटस् एवढे रक्त उपलब्ध होते. मात्र याच दिवशी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात रक्तच उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. मुंबईत महाराष्ट्रासह देशभरातून मोठय़ा प्रमाणात रुग्ण येतात. त्यांची रक्ताची गरज पाहता वर्षाला दोन लाख 20 हजार युनिटस् रक्ताचे संकलन होणे अपेक्षित आहे.

रक्ताची गरज लक्षात घेऊन महापालिकेची रुग्णालये मुंबईबाहेर जाऊन रक्तदान शिबिरे घेत आहेत. रक्तपेढीत रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध राहवा म्हणून नायर रुग्णालय नेहमी प्रयत्नशील राहिले आहे. त्यासाठी आम्ही नेहमीच रक्तदान करणाऱया सामाजिक संस्थाशी संपर्कात असतो. असे बा. य. ल. नायर रुग्णालयचे अधिष्ठाता, डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या