पेट्रोल, डिझेल 5 रुपयांनी महागणार

698

सौदी अरेबियाच्या तेलसाठ्यांवर येमेन बंडखोरांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे जगभरातील कच्च्या तेलांच्या  किमती 12 डॉलर्स प्रतिबॅरलने वाढल्या आहेत. हल्ल्यानंतर सौदीने 50 टक्क्यांनी तेल उत्पादन कमी केल्यामुळे त्याचा फटका जगभरातील तेल आयतदार देशांना बसणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानातही आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाच रुपयांनी वाढणार आहेत.

सौदी अरेबियाच्या अरामको या सरकारी कंपनीच्या दोन मोठ्या तेल प्रकल्पांवर येमेनच्या हुथी बंडखोरांनी ड्रोन हल्ले केले. त्यामुळे कच्चा तेलाचे उत्पादन 50 टक्क्यांनी कमी झाले. जागतिक उत्पादनाच्या 5 टक्क्यांनी हे उत्पादन घटले. सौदी अरेबिया दरदिवशी 100 लाख बॅरल उत्पादन घेत होते ते कमी होऊन 50 लाख बॅरल झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चा तेलाच्या किमती 12 डॉलर्स प्रति बॅरलने वाढल्या. दरम्यान, लवकरच परिस्थितीवर नियंत्रण मिळवून पूर्वीप्रमाणे उत्पादन सुरू करू, असे सौदीने म्हटले आहे.

…तर हिंदुस्थानला वर्षाला 10,700 कोटींचा फटका

कच्चे तेल महाग झाले तर हिंदुस्थानचे आयात बिल आणि व्यापारातील नुकसानही वाढणार आहे. तेलाच्या किमतीत एक डॉलरने जरी वाढ झाली तर हिंदुस्थानला वर्षाला सुमारे 10 हजार 700 कोटींचा फटका बसू शकतो. कोणत्याही परिस्थितीत हिंदुस्थानचा तेलपुरवठा कमी करणार नाही, असे आश्वासन सौदीने दिल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या