जयपूरमध्ये मुंबईच्या विजयाची ‘सत्ता’? रोहित शर्माची सेना सातव्या विजयासाठी सज्ज

सामना ऑनलाईन । जयपूर

दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरात पराभूत केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला मुंबई इंडियन्सचा संघ उद्या राजस्थान रॉयल्सला भिडणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरात धूळ चारून आयपीएलमधला सातवा विजय मिळवण्यासाठी रोहित शर्माची सेना सज्ज असेल. याचसोबत प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेनेही पाऊल टाकेल. यावेळी यजमान संघ राजस्थान रॉयल्ससाठी उद्याची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आतापर्यंत त्यांनी आठ सामन्यांमधून फक्त दोनमध्ये विजय मिळवलेत. सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. प्ले ऑफमध्ये एण्ट्री मारावयाची असल्यास त्यांना या पुढील सर्व लढतींमध्ये विजय आवश्यक आहे.

खेळाडू फॉर्ममध्ये
मुंबई इंडियन्सचे बहुतांशी खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. रोहित शर्मा व क्विण्टॉन डी कॉक या सलामी जोडीला मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी महत्त्वाची खेळी करण्यात दोघेही यशस्वी होत आहेत. हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा, कायरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव यांच्याकडून चमकदार फलंदाजी होतेय. जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना बांधून ठेवले आहे. त्यामुळे उद्याची लढत राजस्थान रॉयल्ससाठी नक्कीच सोपी नसेल.

‘रेस’ आगेकूचसाठीच…
किंग्स इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये उद्या अन्य लढत होणार आहे. यावेळी दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये ही लढाई रंगेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत नऊ सामन्यांमधून प्रत्येकी पाच विजय व चार पराभवांनिशी दहा गुणांची कमाई केलीय. त्यामुळे प्ले ऑफच्या रेसमध्ये आगेकूच करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. श्रेयस अय्यर सेना वि. रविचंद्रन अश्विनची ब्रिगेड यांच्यामधील लढत कोण जिंकतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

यजमान संघाला करायचाय डबल धमाका
राजस्थान रॉयल्सने याआधी या मोसमातील पहिल्या फेरीच्या लढतीत मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. आता अजिंक्य रहाणेचा राजस्थान रॉयल्सचा संघ मुंबई इंडियन्सला दुसऱयांदा पराभूत करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल. पण मुंबई इंडियन्सचा संघ सहजासहजी हार स्वीकारेल असे वाटत नाही. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून पराभवाचा वचपा काढणाऱया मुंबई इंडियन्सला आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचाय.

आजच्या आयपीएल लढती

  • मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स
    जयपूर, संध्याकाळी 4 वाजता
  • दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब
    नवी दिल्ली, रात्री 8 वाजता