मुंबई इंडियन्सचे लक्ष्य ‘प्ले ऑफ’, राजस्थानला हवाय पाचवा विजय

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सने शुक्रवारच्या आयपीएल लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा धुव्वा उडवला. या लढतीत कायरॉन पोलार्डच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.

नेतृत्व बदलल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत बदल झाला नाही. मुंबई इंडियन्सने सातव्या विजयाला गवसणी घातली. आता गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे लक्ष्य असणार आहे ते प्ले ऑफमध्ये धडक मारण्याचे. मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आज अबुधाबी येथे लढत रंगणार आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ आठव्या विजयासह अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल. राजस्थान रॉयल्सचा संघ यावेळी पाचव्या विजयासह या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.

अभी नही तो कभी नही

राजस्थान रॉयल्ससाठी आगामी प्रवास खडतर असणार आहे. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. पण तरीही सर्व लढतींमध्ये विजय मिळवून प्रतिष्ठा त्यांना राखावी लागणार आहे. तसेच इतर संघांच्या लढतीचा निकाल मनाजोगता लागला तर त्यांना अंतिम चारमध्ये पोहोचता येणार आहे. स्टीवन स्मिथ, जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, रॉबीन उथप्पा, जोप्रा आर्चर, राहुल तेवतिया या सर्व खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावून खेळ करायला हवा.

गोलंदाजीमध्ये विविधता

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी विभागात विविधता आहे. जसप्रीत बुमराहकडे वेग आहे. ट्रेण्ट बोल्टकडे स्विंग आहे. राहुल चहर फिरकीची बाजू व्यवस्थित सांभाळतोय.

कृणाल पांडय़ा व कायरॉन पोलार्ड या अष्टपैलू खेळाडूंनी संघाला अद्याप निराश केलेले नाही. जेम्स पॅट्टीनसनला गेल्या काही सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आलेली आहे. त्याच्याऐवजी संघात आलेला पुल्टर नाईल समाधानकारक कामगिरी करतोय.

चेन्नई करणार चाचपणी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यामध्ये आज अन्य लढत रंगणार आहे. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आठव्या विजयासह प्ले ऑफमधील स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील.

चेन्नई सुपरकिंग्सचा या स्पर्धेतील खेळखल्लास झालाय. त्यामुळे हा संघ पुढल्या मोसमाची तयारी करतोय. याची चाचपणी या संघाचे व्यवस्थापन करील. उर्वरित लढतींमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघामध्ये बेंचवरील खेळाडूंना संधी देण्यात येईल.

क्विण्टॉन डी कॉक सुसाट

मुंबई इंडियन्सचा संघ या स्पर्धेत छान कामगिरी करतोय. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्हीमध्ये खेळाडू कात टाकताहेत. पण गेल्या काही सामन्यांमध्ये एका खेळाडूची कामगिरी काबिल ए तारीफ ठरलीय. सलामी फलंदाज क्विण्टॉन डी कॉक याने चार अर्धशतकांसह 368 धावांचा पाऊस पाडलाय.

चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या लढतीत इशान किशनला सलामीला पाठवण्यात आले होते. त्यानेही या लढतीत आक्रमक फलंदाजी करीत रोहित शर्माची कमी जाणवू दिली नाही. त्यामुळे रोहित शर्मा (260 धावा), सूर्यपुमार यादव (243 धावा), कायरॉन पोलार्ड (208 धावा), हार्दिक पांडय़ा (164 धावा) यांच्यासह या संघाची फलंदाजी आणखीनच मजबूत बनतेय. यामुळे आज जोफ्रा आर्चर अॅण्ड कंपनीसमोर मोठे आव्हान असेल यात शंका नाही.

आजच्या लढती

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपरकिंग्स
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
दुपारी 3.30 वाजता

मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स
झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या