मुंबईचा पंजाबवर 8 गडी राखून शानदार विजय

16

सामना ऑनलाईन । इंदूर

पंजाबवीर हाशिम आमला(६० चेंडूंत १०४) याच्या तुफानी हमल्यामुळे पंजाबने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १९९ धावांचे आव्हान उभारले; पण मुंबईचे सलामीवीर जोस बटलर (३७ चेंडूंत ७७), पार्थिव पटेल (१८ चेंडूंत ३७) व डावखुरा नितीश राणा (३४ चेंडूंत ६२) यांच्या धमाक्यामुळे मुंबईने पंजाबचा ८ विकेट आणि २७ चेंडू राखून दणदणीत पराभव केला. या विजयाने मुंबईकरांनी १०व्या आयपीएलमधला आपला सलग पाचवा नेत्रदीपक विजय साकारला. ऐतिहासिक होळकर मैदानावर मुंबईने १५.३ षटकांत २ बाद १९९ ही विजयी धावसंख्या रचली. ३७ चेंडूंत ७७ धावांची खेळी करणारा जोस बटलर या लढतीचा ‘मॅन ऑफ दी मॅच’ ठरला. आजच्या विजयाने मुंबईने गुणतालिकेत टॉपच्या स्थानावर झेप घेतली आहे.

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी विजयासाठीच्या १९९ धावांचा पाठलाग अगदी लीलया केला. सुरुवातीपासून चौकार, षटकारांची बरसात करीत पार्थिव पटेल (३७) व जोश बटलर (७७) या सलामीवीरांनी ५.५ षटकांत ८१ धावांची भागीदारी करीत पंजाबच्या विजयाच्या आशा धूसर केल्या. बटलरने ५ षटकार व ७ चौकारांची नोंद केली. मुंबईच्या फलंदाजांनी आज १५ षटकार व १३ चौकारांची आतषबाजी केली.

आमलाची शतकी खेळी निष्फळ
‘पंजाब’चा सलामीवीर हाशिम आमलाने आज ६ षटकार व ८ चौकार ठोकत ६० चेंडूंत १०४ धावांची शानदार शतकी खेळी केली, पण त्याची ही खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. आमलाला सुरेख साथ देत कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूंत ४० धावांची तडाखेबंद खेळी साकारली. या लढतीतील स्टायलिश फलंदाज म्हणून आमलाला गौरविण्यात आले.
नितीश ठरला लढतीचा ‘राणा’
१०व्या आयपीएलमध्ये मुंबईच्या अगोदरच्या ४ विजयांत सिंहाचा वाटा उचलणारा डावखुरा नितीश राणा पंजाबविरुद्धच्या लढतीचा ‘राणा’ ठरला. त्याने ७ षटकारांची नोंद करीत ३४ चेंडूंत नाबाद ६२ धावांची खेळी केली. राणाने बटलरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची धडाकेबाज भागीदारी साकारली.

आपली प्रतिक्रिया द्या