दंडवसुलीसाठी पोलीस घेणार इन्शुरन्स कंपन्यांची मदत

388

‘वन स्टेट वन चलान’ या मोहिमे अंतर्गत राज्यभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱयांवर सर्रास ई-चलान केले जात आहे. पण चलानच्या तुलनेत दंडाची वसुली मात्र होत नाही. परिणामी दंडाच्या रकमेचा डोंगर वाढतच चालल्याने याची पोलीस विभागाने आता गंभीर दखल घेतली आहे. कोटय़ावधींच्या घरात गेलेली दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पोलीस इन्शुरन्स कंपन्यांची मदत घेणार आहेत.

गेल्या जानेवारीपासून राज्यभरात ई-चलान करण्याचे काम जोरात केले जातेय. पण या ई-चलानबाबत अद्याप पाहिजे तितकी जनजागृती नसल्याने चालकांना आपल्यावर चलान झाल्याने समजतच नाही. परिणामी चालकांकडून नियम मोडले जातात आणि त्यांच्यावर एकामागे एक चलानची कारवाई होते. परंतु चलान झाल्याचे समजत नसल्याने त्यांच्याकडून दंडाची रक्कम भरली जात नाही. त्यामुळे अनेकांवर हजारो रुपयांचा दंड पेंडिंग असून हा आकडा करोडोच्या घरात गेला आहे. ही दंडवसुली करण्यासाठी विविध उपाययोजना याआधी केल्या, पण त्याचा म्हणावा तितका परिणाम झाला नाही. त्यामुळे आता या दंडवसुलीसाठी पोलिसांनी इन्शुरन्स कंपन्यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. याबाबत दोन्ही यंत्रणांमध्ये बोलणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहेत. पोलिसांकडून आवश्यक चलानचा डेटा पुरवल्यानंतर इन्शुरन्स कंपन्या ई-चलानच्या दंडाची वसुली करण्यास सुरुवात करतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

  • मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, नाशिक, पुणे, नागपूर, संभाजीनगरमध्ये दंडाचे प्रमाण सर्वाधिक.
  • चलान संबंधांतील ऍप डाऊनलोड करण्याचे पोलिसांचे आवाहन.
  • एकावर पाच हजारांपेक्षा जास्त दंड झालेल्यांची संख्या मोठी.

ई-चलान प्रक्रियेबाबत बऱयाचदा जनजागृती करण्यात आली आहे. पोलिसांचे ऍप असून ते डाऊनलोड केल्यास आपल्यावर चलान झालेय का ते पुराव्यानिशी तेथे पाहता येते. पण नागरिक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. पण असे करून चालणारे नाही. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत आणि चलानची कारवाई झाली असल्यास लगेच दंड भरला पाहिजे. – विजय पाटील (अधीक्षक, महामार्ग पोलीस)

कशी होणार वसुली…

प्रत्येक चालकाला त्याच्या गाडीच्या इन्शुरन्सचे नूतनीकरण वर्षातून एकदा करावेच लागते. मग जेव्हा चालक इन्शुरन्स नूतनीकरण्यासाठी जाईल तेव्हा त्याच्या नावावर किती ई-चलान पेंडिंग आहे ते पाहिले जाईल. जर दंडाची रक्कम भरलेली नसेल तर इन्शुरन्ससह चलानच्या दंडाची रक्कम तत्काळ भरण्यास सांगितले जाईल. चालकाने तिथे दंड भरण्यास नकार दिला तर त्याचे इन्शुरन्स नूतनीकरण करून दिले जाणार नाही. त्यामुळे काहीही करून चालकांना त्यांच्यावर झालेल्या चलानच्या दंडाची रक्कम भरणे भाग पडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या