नवरात्रोत्सवासाठी मुंबईची शक्तिपीठे सज्ज

45

सामना प्रतिनिधी । मुंबई

गुरुवारपासून सुरू होणाऱया शारदीय नवरात्रोत्सवासाठी श्री मुंबादेवी आणि महालक्ष्मी ही शक्तिपीठे सज्ज झाली आहेत. दोन्ही मंदिरे आणि परिसरावर सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता पिण्याचे पाणी, चप्पल स्टँड, वैद्यकीय पथके अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महालक्ष्मी मंदिरात नवरात्रींच्या दर दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ललिता पंचमी, अष्टमी आणि सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या अडीच लाखांपर्यंत जाते. मंदिर व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार मंदिर सकाळी 5 वाजता उघडून रात्री 11 वाजता बंद करण्यात येईल. मंदिराच्या आवारात आणि हाजीअलीपर्यंतच्या परिसरात 60 सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आले आहेत. गावदेवी पोलीस ठाणे तसेच महाराष्ट्र सुरक्षा बल महामंडळाचे 39 सुरक्षारक्षक यांची सुरक्षाव्यवस्था असेल. याशिवाय वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, अनिरुद्ध ऍकॅडमी, नागरी सेवा दल, होमगार्ड यांची मदत घेण्यात येते. मंदिरात ऍम्बुलन्स आणि सकाळ- संध्याकाळ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे.

महालक्ष्मी मंदिरात येताना भाविकांनी पूजेचे साहित्य प्लॅस्टिकची थाळी किंवा छोटय़ा टोपलीतूनच आणावे, असे व्यवस्थापक भालचंद्र वालावलकर यांनी सांगितले आहे.

महालक्ष्मी मंदिरात भाविकांसाठी पेंडॉल उभारला असून त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व सरबताची सोय तसेच विनामूल्य चप्पल स्टँड आहे.

वृद्ध, अपंगांसाठी लिफ्ट, सरकत्या जिन्यांची मागणी

वृद्ध, अपंग भाविकांना महालक्ष्मी मंदिराच्या पायऱया चढताना त्रास होतो. त्यांच्याकडून लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात आला आहे. याबाबत पाठपुरावा करून नोव्हेंबरपर्यंत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे महालक्ष्मी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांनी सांगितले.

मुंबादेवी मंदिराच्या मागच्या गेटमधून भाविकांना एक्झिट

नवरात्रोत्सवात मुंबादेवी मंदिराच्या मागील प्रवेशद्वारातून भाविकांना बाहेर पडता येईल, अशी माहिती श्री मुंबादेवी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी दिली. मुंबादेवी रोडवर मंडप घालण्यात आला आहे. पावसाचे सावट लक्षात घेऊन मान्सून शीट वापरण्यात आली आहे. दिवसाला 70 ते 75 सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. मुंबादेवी भक्त मंडळ, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे स्वयंसेवक उपस्थित असतील. तसेच दहा डॉक्टरांचे पथक आणि ऍम्ब्युलन्स सज्ज असेल. पहिल्या दिवशी मुंबादेवी मंदिर पहाटे 5.30 वाजता उघडेल आणि रात्री 11 वाजता बंद होईल, असे हेमंत जाधव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या