शाहिदचा ‘कबीर सिंग’ सुसाट, 5 दिवसात 100 कोटी

सामना ऑनलाईन। मुंबई

शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून 5 दिवसात या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट शाहिदच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा ठरला असून कबीर सिंगचे सर्वच शो हाऊसफुल आहेत.

कबीर सिंग चित्रपटाची कथा एका सनकी व्यसनी डॉक्टरवर आधारलेली आहे. यामुळे सुरुवातीला अनेकांनी या चित्रपटावर टीका केली होती. यात शाहिदची भूमिका महिला विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शाहिदच्या या चित्रपटामुळे डॉक्टरांची चुकीची प्रतिमा समाजात पसरत असल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे. पण चित्रपटप्रेमींनी त्याकडे दुर्लक्ष करत कबीर सिंगला डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटातील शाहिदचा अभिनय प्रेक्षकांना भावला असून यात कियारा अडवाणी ही त्याची सहनायिका आहे. दरम्यान, कबीर सिंग हा शाहिदचा पहिलाच असा सोलो चित्रपट आहे जो 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. तरण आदर्श यांनी कबीर सिंगला ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून घोषित केले आहे.