नववर्षाच्या स्वागतासाठी ती मुंबईत आली पण…

सामना ऑनलाईन । मुंबई

गुजरातच्या पालडी येथे राहणारी यशा आलप ठक्कर (२२) नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत आली होती. ती नातेवाईकांकडे थांबली होती. थर्टी फर्स्टला काय काय करायचे, मुंबईत कुठे कुठे फिरायला जायचे याचे ती प्लॅनिंग करीत होती. दरम्यान, गुरुवारी रात्री यशा तिचा चुलतभाऊ आणि बहिणीसोबत जेवण करण्याकरिता मोजोस रेस्टॉरंट ऍण्ड पबमध्ये गेली होती. जेवण करीत असतानाच अचानक आग लागली. आग लागताच सर्वांची धावपळ उडाली. तिची चुलत बहीण जीव वाचविण्यासाठी वॉशरूममध्ये गेली, तर यशाला रेस्टॉरंटमधून बाहेर पडता आले नाही किंवा सुखरूप ठिकाणी लपता आले नाही. त्यामुळे ती धुरामध्ये सापडली आणि त्यातच तिचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. यशाने अलीकडेच चार्टर्ड अकाऊंटची परीक्षा दिली होती. सीए होण्याबरोबर मुंबईत नववर्षाचे स्वागत करण्याचे तिचे स्वप्न अपुरे राहिले.

शिवसेना मदतीला धावली
आगीचे वृत्त कळताच लोअर परळ, करी रोड, एल्फिन्स्टन पसिसरातील शिवसैनिक तत्काळ घटनास्थळी मदतकार्यासाठी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी शिवसेनेच्या ऍम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर हे घटनास्थळी पोहोचले. जखमींना ऍम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात पोहचविण्यात शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. जखमींप्रमाणेच मृतांना शोधण्यास येणाऱया नातेवाईकांनाही शिवसैनिकांकडून सर्व ते सहकार्य करण्यात येत होते. आमदार नीलम गोऱ्हे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या