गणेश चतुर्थीपर्यंत कोकणात धावणार एसटीची लाल परी

802

गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘एका अटीवर’ खुशखबर आहे. आता 21 ऑगस्टपर्यंत मुंबईकर एसटीने गावी जाऊ शकतात, पण त्यासाठी त्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देणे गरजेचे आहे. या गाडय़ांचे आरक्षण सोमवारी मध्यरात्रीपासूनच सुरू झाले आहे. चाकरमान्यांना गणेश चतुर्थीपर्यंत कोकणात जाता येईल, हे आता नक्की झाले आहे.

कोकणात दहा दिवसांचे क्वारंटाइन असल्याने एसटी महामंडळाने 12 ऑगस्टपर्यंतच गाडय़ा सोडण्याचे जाहीर केले होते आणि तसे नियोजनही केले होते. मात्र या नियोजनात आता बदल करण्यात आला असून 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान कुणाला गावी जायचे असेल तर त्यालाही एसटी सेवा देणार आहे.

कोविड टेस्ट करावी लागणार

प्रवाशांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणी निगेटिव्ह आली तर प्रवास करता येईल. चाचणी पॉझिटिव्ह आली तर प्रवास करता येणार नाहीच, पण तिकिटाचे पैसेही परत मिळणार नाहीत. त्याची रवानगी थेट उपचार पेंद्रात केली जाणार आहे.एसटीला चांगला प्रतिसाद मिळत असून सोमवारी अखेर तब्बल 10 हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या