कुर्ल्यात जलवाहिनी दुरुस्तीदरम्यान शॉक लागून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

कुर्ला पूर्व सुमननगर येथे जलवाहिनी दुरुस्तीदरम्यान शॉक लागून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आणखी पाच कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबईच्या कुर्ला पूर्व सुमन नगर येथील ट्रॅफिक चौकीजवळ पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी पालिकेच्या पाणी विभागातील सात कर्मचारी गेले होते. पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करत असताना त्यात विद्युत प्रवाह वाहून शॉक लागल्याने हे सातही कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत गणेश उगले (45), अमोल काळे (40) हे दोन कर्मचारी मृत झाले. दरम्यान, संबंधित घटनेची चौकशी होणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

जखमींची प्रकृती स्थिर

या दुर्घटनेत जखमी झालेले नाना पुकळे (41), महेश जाधव (40), नरेश अढांगळे (40), राकेश जाधव (39), अनिल चव्हाण (43) हे पाच कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

घटनेची सखोल चौकशी करा – खासदार शेवाळे

सुमननगर दुर्घटनेत दोन पालिका कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा प्रकार दुर्दैवी आहे. घटनास्थळी पाहणी केल्यावर कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सबमर्सिबल पंप हाताळण्यात झालेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते. पालिका आयुक्तांनी या घटनेची सखोल चौकशी करायला हवी. तसेच मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना नुकसानभरपाई आणि मृतांच्या वारसांना पालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जल विभागाच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या