दसऱ्याच्या मूहुर्तावर रेल्वे प्रवाशांसाठी शुभवार्ता; लोकल प्रवासातील अडथळे झाले कमी

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी आता मासिक पास शिवाय तिकीटही मिळणार आहे. सोबतच 18 वर्षांखालील सर्वांना कोणत्याही अटीविना प्रवास करता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे लॉकडाउन लागल्यापासून लोकल ट्रेनच्या प्रवासावर बंधने आली होती. पहिल्या लाटेनंतर लोकल प्रवासाकरिता अटींसह परवानगी देण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत परिस्थिती अधिकच बिकट झाल्यानंतर रेल्वे प्रवासाठीच्या अटी वाढवण्यात आल्या. 15 ऑगस्टपासून कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, त्यातही एक अडचण होती ती म्हणजे अशा प्रवाशांना केवळ मासिक पास दिला जात होता. तिकीट दिले जात नव्हते. त्यामुळे क्वचित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत होते. एखाद दोन वेळच्या प्रवासासाठी मासिक पास काढणे महाग पडत होते. रेल्वे प्रशासनाने आज जाहीर केलेल्या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार, कोविडचे दोन डोस पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना तिकीट देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मात्र, तिकीट खिडकीवरच ही सुविधा उपलब्ध असेल. अन्य कुठल्याही प्रकारे तिकीट मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

18 वर्षांखालील सर्वांना आता रेल्वेने प्रवास करता येणार आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आठवीपासून पुढच्या वर्गातील शाळा व महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. मात्र, 18 वर्षांखालील मुलांना लस देण्याची प्रक्रियाच सुरू न झाल्याने त्यांना लसीच्या अटीची पूर्तता करता येणे अशक्य होती. आता मात्र ही अडचण दूर होणार आहे.

railway