निवडणूक लढवण्यासाठीचा प्रज्ञा सिंह यांचा मार्ग मोकळा, NIA न्यायालयाचा दिलासा

sadhvi-pragya-singh-thakur

सामना ऑनलाईन। मुंबई

भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना NIA न्यायालयाने दिलासा दिला आहे. साध्वी यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकाकर्त्यांने याचिकेत स्वाक्षरीच केलेली नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयात युक्तिवाद सादर करताना म्हटले की साध्वी प्रज्ञा यांना तब्येत बरी नसल्याने जामीन देण्यात आला आहे. पण त्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. यावेळी साध्वी यांची बाजू मांडणारे वकील जेपी मिश्रा यांनी साध्वी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून एक डॉक्टर नेहमी त्यांच्यासोबत असतो अशी माहिती न्यायालयाला दिली. तसेच त्या विचारधारा आणि देशाच्या आधारावर निवडणूक लढवत आहेत. भगवा दहशतवाद असे काही नसते हे सिद्ध करण्यासाठी त्या निवडणूक लढवत आहेत असे मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले.

काय आहे प्रकरण
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एका पीडितेच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने साध्वी यांच्याकडून उत्तर मागितले होते. यावर ,साध्वी यांनी ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. केवळ लोकप्रियतेसाठी केलेले हे काम असून याचिकाकर्त्याने न्यायालयाचा वेळ वाया घालवला आहे, यामुळे याचिकाकर्त्याकडून दंड वसूल करावा अशी मागणीही साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून करण्यात आली होती.

नाशिक जिह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सहा जण ठार तर 100 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. याप्रकरणी साध्वी प्रज्ञा यांच्यासह अनेक जणांना आरोपी ठरवण्यात आले होते. एनआयएने तपासानंतर साध्वी यांना क्लिनचीट दिली होती. पण अजूनही हा खटला न्यायालयात सुरू असून साध्वी सध्या जामिनावर आहेत.