मुंबईत लक्झरी फ्लॅट्स विक्री जोरात! सहा महिन्यांत 4 हजार कोटी रुपयांची उलाढाल

कोरोनाच्या महामारीतून सावरत रिअल इस्टेट क्षेत्राने पुन्हा एकदा गगनभरारी घेतल्याचे दिसतेय. मुंबईत गेल्या सहा महिन्यांमध्ये लक्झरी फ्लॅट्सच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. 15 ते 100 कोटी रुपये किमतीच्या लक्झरी फ्लॅट्सच्या विक्रीतून तब्बल चार हजार कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती स्क्वेअर यार्डस्च्या अहवालातून पुढे आली आहे.

स्क्वेअर यार्डस्ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात जानेवारी ते जून 2021 या कालावधीत लग्झरी घरांच्या विक्रीचा अभ्यास करण्यात आला होता. कोरोना काळात ठप्प झालेल्या रिअल एस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने स्टॅम्प डय़ुटीमध्ये सवलत दिली होती. 31 मार्चपर्यंत केवळ 2 टक्के स्टॅम्प डय़ुटी ग्राहकांना भरावी लागत होती. या सवलतीचा फायदा घेत अनेकांनी लग्झरी घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केल्याचे दिसले आहे. एकूण 60 टक्के घरांची नोंदणी मार्चपूर्वी झाली आहे. विशेष म्हणजे लक्झरी घरखरेदीसाठी ग्राहकांची सर्वाधिक पसंती लोअर परळला असल्याचे दिसले आहे. एकूण 60 टक्के उलाढाल येथील घरविक्रीतून झाली आहे.

  • अहवालातील माहितीनुसार, 15 ते 20 कोटी किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण 45 टक्के आहे, तर 40 टक्के विकली गेलेली घरे 20 ते 30 कोटी रुपये किमतीची आहेत. 30 ते 50 कोटी रुपयांच्या घरविक्रीचे प्रमाण 10 टक्के, तर 50 कोटींहून अधिक किमतीच्या घरविक्रीचे प्रमाण 7 टक्के आहे.
  • तब्बल 43 टक्के ग्राहकांनी 4 हजार ते 6 हजार चौरस फुटांच्या घरखरेदीला पसंती दिली आहे.
  • घरखरेदी करणाऱया 67 टक्के ग्राहकांचे वय 40 हून अधिक होते, तर 35 टक्के घरखरेदी करणारे ग्राहक रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित होते.
आपली प्रतिक्रिया द्या