महानंद डेअरी करणार वीजनिर्मिती

32

सामना प्रतिनिधी । मुंबई

दही, ताक, लस्सीच्या उत्पादनानंतर आता महानंद डेअरी स्वतः वीजनिर्मिती करणार आहे. महानंद डेअरीला प्रत्येक महिन्याला जवळपास 50 लाख रुपये एवढे वीज बिल येते. ते कमी करण्यासाठी डेअरीने स्वतः सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र ऊर्जा विकास विभागाकडून (मेडा)प्रकल्प अहवाल मागवला आहे.

महानंद डेअरीच्या गोरेगाव येथील दुग्धशाळेत राज्यभरातून आलेल्या दुधावर प्रक्रिया करून पॅकिंग केले जाते. तसेच दही, ताक, लस्सी, मसाले दूध, तूप अशी अनेक उत्पादने बनवली जातात. तसेच डेअरीचे प्रशासकीय कार्यालयही येथेच आहे. त्यामुळे दररोज मोठय़ा प्रमाणात विजेचा वापर होत असल्याने महिन्याला 50 लाख रुपयांहून अधिक वीज बिल भरावे लागते. दुधाचा वाढलेला दर आणि पॅकिंग खर्चात वाढ झाल्याने डेअरीचा कारभार तोटय़ात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर डेअरीच्या वीज बिलात कपात करण्यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा अशी ओळख असलेल्या सौर ऊर्जानिर्मितीसाठी सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याबाबत ‘मेडा’ या शासकीय संस्थेशी नुकतीच बैठक झाली आहे. डेअरीच्या कंपाऊंडमधील सर्व पथदिवे आणि अन्य इलेक्ट्रिक उपकरणे या विजेवर चालवणे शक्य होणार आहे. दरम्यान, या सौर प्रकल्पासाठी सुमारे 25 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल, असे डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक घनशाम मंगळे यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे डेअरीच्या वीज बिलाचा आकडा कमी होणार आहे.

पाणीही गरम करता येणार

महानंद डेअरीमध्ये सध्या छोटय़ा क्षमतेचा सौर प्रकल्प असून त्या माध्यमातून बॉयलरला लागणारे पाणी गरम केले जाते; पण आता नवा सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यानंतर विजेबरोबरच बॉयलरसाठी लागणारे पाणी गरम करण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या