‘ऑनलाईन’अभिवादन आवाहनाला अनुयायांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद – महापौर किशोरी पेडणेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. मात्र, यंदा खबरदारीची योजना म्हणून कोविड विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात आले. या आवाहनाला अनुयायांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे दिसून येत असून चैत्यभूमीवर नागरिक आलेले नसल्याचे पहावयास मिळाले. हा प्रतिसाद कौतुकास्पद आहे, असे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी काढले.

भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन रविवार, दिनांक 6 डिसेंबर, 2020 रोजी आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची तसेच महापरिनिर्वाण दिन तयारी बाबतची माहिती देणारी पुस्तिका महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते चैत्यभूमी लगतच्या नियंत्रण कक्ष येथे आज (दिनांक 5 डिसेंबर, 2020) सकाळी करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी आमदार यामिनी यशवंत जाधव, उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रविणा मोरजकर, नगरसेवक अमेय घोले तसेच उपायुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

महापौर किशोरी पेडणेकर याप्रसंगी म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असणारे ‘चैत्यभूमी’ हे प्रेरणादायी स्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे या व्यासपीठावर आम्ही विराजमान आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी येतात. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधाही पुरवल्या जातात. यंदा मात्र स्थिती वेगळी आहे. कोविड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन आणि आपण सर्व सहकार्याने प्रयत्न करत आहोत. कोविडमुळे एकत्र येण्यावर असलेल्या मर्यादा पाहता अनुयायांनी यंदा चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेने सातत्याने केले आहे. त्यास अनुयायांनी संपूर्ण प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे. कारण दरवर्षी 5 डिसेंबरला देखील अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी रिघ असते. यंदा ती रिघ, अनुयायी दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य रविवारी 6 डिसेंबर रोजी देखील अपेक्षित आहे, असे आवाहनही महापौरांनी याप्रसंगी पुन्हा एकदा केले. तसेच महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अनुयांयाचे विशेष आभारही महापौरांनी मानले आहेत.

आमदार यामिनी यशवंत जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, सर्वाधिक शैक्षणिक पदव्या प्राप्त करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना संविधानातून अधिकार, संरक्षण यासोबत सन्मानही मिळवून दिला आहे. संपूर्ण देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून योगदान दिले आहे. दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱया अनुयायांना चांगल्या सेवा-सुविधा पुरवता याव्यात, यासाठी महानगरपालिकेकडून उपलब्ध होत असलेल्या निधीमध्ये सतत वाढ करण्यात येत आहे, ही चांगली बाब आहे. यंदा कोरोनामुळे अनुयायांनी येऊ नये, यासाठी वेळीच करण्यात करण्यात आलेले आवाहन आणि देण्यात आलेल्या सूचना यांचा योग्य परिणाम दिसून येतो आहे. या सुचनांचे पालन अनुयायी करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने होत असलेल्या सर्व कार्यवाहीबद्दल आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी आभारही मानले.

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिका महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर असणाऱया ‘प्रकाशन’या सदराखाली ई-पुस्तके या विभागामध्ये ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती पुस्तिका २०२०’या नावाने उपलब्ध आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना उद्या महापरिनिर्वाण दिनी (दिनांक 6 डिसेंबर, 2020) अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.

दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी 7.45 ते 9 या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी 9.50, 10.50, 11.50 तसेच दुपारी 12.50 वाजता दर 10 मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.

सोबत, महापरिनिर्वाण दिनी सोशल मीडियावरून ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे लिंक उपलब्ध आहेत. यूट्यूब: bit.ly/abhivadan2020yt / फेसबूक: bit.ly/abhivadan2020fb / ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt

आपली प्रतिक्रिया द्या