5 दिवसांचं पळवलेलं बाळ 7 तासात परत मिळवलं, महिलेला अटक

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ अवघ्या 7 तासाच्या आत पोलिसांनी शोधून काढलं असून हे बाळ पुन्हा त्याच्या आईच्या कुशीत विसावलं आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हे बाळ एका महिलेने पळवून नेलं होतं. ही महिला बाळ चोरून पळत असताना सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. यानंतर पोलिसांनी बाळाच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करायाला सुरुवात केली.
nair-hospital-stolen-baby
मुंबई पोलिसांनी हेजल कोरिआ या महिलेला अटक केली आहे. ही महिला नालासोपाऱ्याची रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. हेजलने नायर रुग्णालयातून दहिसरच्या रहिवासी असलेल्या शीतल साळवी यांचं बाळ गुरुवारी पळवून नेलं होतं. हेजलने बाळ चोरल्यानंतर थोड्यावेळाने त्या बाळाने रडायला सुरुवात केली. यामुळे गोंधळलेली हेजल वाकोल्यातील एका रुग्णालयात गेली होती. तिथल्या कर्मचाऱ्यांनी हेजलला प्रसुती कुठे झाली असा प्रश्न विचारला. या प्रश्नामुळे ती गडबडली आणि तिने थातूरमातूर उत्तरं द्यायला सुरुवात केली. या उत्तरांमुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना तिच्यावर शंका यायला सुरुवात झाली. नायर रुग्णालयातील सीसीटीव्ही दृश्य तोपर्यंत व्हायरल झाल्याने या कर्मचाऱ्यांनी नायर हॉस्पीटलशी संपर्क साधून खरोखर त्यांच्याकडून बाळ चोरीला गेलं आहे का याची विचारणा केली. त्याचं उत्तर होकारार्थी आल्यानंतर या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिने बाळ चोरल्याचं कबूल केलं.

 

वाकोला पोलीस ठाणे यांनी बाळ सापडल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याला दिली. आग्रीपाडा पोलिसांनी हे बाळ सुखरूपपणे त्याच्या आईकडे चोरीला गेल्याच्या अवघ्या 9 तासात सोपवले. बाळ परत आईच्या कुशीत विसावल्याचं पाहिल्यानंतर पोलिसांना मनस्वी आनंद झाला. पोलीस हेजलची चौकशी करत असून तिने बाळ का चोरलं याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे.