सावधान! मुंबईत आता मलेरियाचेही आव्हान!! 20 जुलैनंतर मोठी वाढ

651

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पालिकेसमोर आता मलेरियाने आव्हान निर्माण केले आहे. 20 जुलैपर्यंत आटोक्यात असणारी मलेरिया रुग्णांची संख्या आता मात्र गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढून 872पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी-खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत पालिकेने युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे कोरोना आता चांगलाच नियंत्रणात आला असून केवळ सुमारे 19 हजार अॅक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. मात्र आता मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या वर्षी 1 ते 20 जुलै या कालावधीत मलेरियाचे 438 रुग्ण आढळले होते, तर या वर्षी 443 रुग्ण आढळले. 20 जुलैपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त मलेरियाचे केवळ 5 रुग्ण जास्त होते. मात्र 20 जुलैनंतर मलेरिया रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह पेरिपेâरल रुग्णालयांमध्ये पावसाळी आजारांसाठी दीड हजारांवर बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, डेंग्यू-मलेरिया टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन डासांची लाखो उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात येत आहेत. तरीदेखील नागरिकांनी डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नयेत यासाठी पाणी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी, ताप, डोकेदुखी, उलटी, थकवा अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्वâ साधावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

अशी आहे सद्यस्थिती
आजार 2019 2010
मलेरिया 438 872
लेप्टो.          74 14
एच1एन1 123 0
गॅस्ट्रो         994 53
हिपेटायटीस 270  1
डेंग्यू          29 11

मलेरियाचे रुग्ण वाढत असले तरी पालिकेच्या माध्यमातून रुग्णांना उपचार, सुविधा देण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे. कोरोना नियंत्रणासाठी गेलेले मनुष्यबळही आता पावसाळी आजार नियंत्रणासाठी उपलब्ध झाले असून सुविधाही वाढल्या आहेत. तरीदेखील नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेऊन आजार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी!
– डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

पालिकेच्या पाहणीत बड्या सोसायट्या आणि घरांमध्ये मलेरिया आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. या तुलनेत पालिकेने केलेल्या कामामुळे मोकळ्या जागेत कमी मलेरिया डास, रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मलेरिया रोखण्यासाठी मुंबईकरांनी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे. पाणी साठू देऊ नये. पालिका सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहे.
– किशोरी पेडणेकर, महापौर

आपली प्रतिक्रिया द्या