इथिओपियाच्या हरिसाने रचला इतिहास, मुंबई मॅरेथॉन जिंकताना नोंदवली विक्रमी वेळ

267

इथिओपियाच्या डेअरा हरिसा याने रविवारी मुंबईत इतिहास रचला. त्याने टाटा मुंबई मॅरेथॉन शर्यत 2.08.09 अशा वेळेसह जिंकत प्रतिष्ठेच्या शर्यतीत नवा विक्रम नोंदवला. याआधी 2016 साली केनियाच्या गिडीयॉन किपकेटर याने 2.08.35 अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत मुंबई मॅरेथॉनमध्ये विक्रम केला होता. चार वर्षांनंतर हा विक्रम मोडला गेला हे विशेष. महिला गटातही इथिओपियाच्याच अमाने बेरिसो हिने चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. तिने 2.24.51 अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत जेतेपदावर मोहोर उमटवली.

नव्या शूजसह जेतेपद

डेअरा हरिसाचे शर्यतीसाठी वापरण्यात येणारे शूज विमानतळावरच हरवले. शर्यतीच्या आदल्या दिवशी अब्राहम यांनी त्याला नवे शूज दिले. या नव्या शूजसह डेअरा हरिसा याने मुंबई मॅरेथॉनमध्ये देदीप्यमान कामगिरी करून दाखवली. इथिओपियाच्या अयेले अबशेरो याने 2.08.20 अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत रौप्य आणि इथिओपियाच्याच बिरहानू तेशोमे याने 2.08.26 अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत कास्य पदक जिंकले.

18 सेकंदांनी हुकला विक्रम

आंतरराष्ट्रीय महिला गटातही नवा विक्रम होता होता राहिला. इथिओपियाच्या अमाने बेरिसो हिने 2.24.51 अशा वेळेसह शर्यत जिंकली. यावेळी मुंबई मॅरेथॉनमधील महिला गटाचा 2.24.33 हा विक्रम तिला मोडता आला नाही. 18 सेकंदांनी तिचा हा विक्रम हुकला. केनियाच्या व्हॅलेंटाईन किपकेटर हिने 2013 साली हा विक्रम केला होता. केनियाच्या रोदा जेपकोरीर हिने 2.27.14 या वेळेसह शर्यत पूर्ण करीत दुसरा तर इथिओपियाच्या हॅवेन हेलू हिने 2.28.56 या वेळेसह शर्यत पूर्ण करीत तिसरा क्रमांक पटकावला.

आपली प्रतिक्रिया द्या