हाफ मॅरेथॉनमध्ये नाशिक कनेक्शन, आरती पाटील, मोनिका आथरे अव्वल तीनमध्ये

637

टाटा मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये यंदाही महाराष्ट्राच्या महिला धावपटूंनी ठसा उमटवला. मूळची नाशिकची असलेली मोनिका आथरे हिने कास्य पदक पटकावले, तर मूळची कोल्हापूरची असलेली व मुंबई कस्टम्समध्ये नोकरी करीत असलेली आणि नाशिकमध्ये सराव करणारी आरती पाटील हिने पहिल्याच प्रयत्नात दुसऱया स्थानावर झेप घेतली. पारूल चौधरी हिने महिला हाफ मॅरेथॉन जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

दुखापतीवर केली मात

गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोनिका आथरेला गेल्या वर्षभरात संकटांचा सामना करावा लागला. काही डॉक्टर्सनी तर तिला खेळापासून दूर रहा असा सल्लाही दिला. पण कुटुंबीय, प्रशिक्षक यांचा मोलाचा सपोर्ट, मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळे तिने दुखापतीवर मात करीत मुंबई मॅरेथॉनमध्ये अव्वल तीनमध्ये येण्याचा पराक्रम करून दाखवला. मुंबई मॅरेथॉनमध्ये आतापर्यंत सहा वेळा अव्वल तीन खेळाडूंमध्ये येण्यात मोनिका आथरेला यश लाभले आहे.

कोल्हापूरची कन्या

कोल्हापूर, कडगाव, गडहिंग्लज येथील आरती पाटील हिने मुंबई मॅरेथॉनच्या पहिल्याच प्रयत्नात दुसरा क्रमांक पटकावला तो 23 व्या वर्षी. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या या कन्येला इयत्ता पाचवीपासूनच धावण्याबाबत आवड निर्माण झाली. काकांचा मुलगा धावतोय हे पाहून तिचीही पावले याकडे वळली. 14 वर्षांच्या आतील वयोगटात असताना तिने 19 वर्षांखालील गटाच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले आणि तिथूनच तिच्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली. तिथून तिने मागू वळून बघितले नाही.

महिला हाफ मॅरेथॉनमधील विजेते

  • पारूल चौधरी – 1.15.37
  • आरती पाटील – 1.18.03
  • मोनिका आथरे – 1.18.33
आपली प्रतिक्रिया द्या