मुंबई ‘जिद्दी’ने धावली…

32

मुंबई- आल्हाददायक वातावरण… गुलाबी थंडी… अन् धावपटूंचा सळसळता उत्साह… रविवारी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये हे चित्र पाहायला मिळाले. जवळपास ४२ हजारांपेक्षा वर धावपटूंनी शर्यतीत सहभाग घेऊन प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया या मॅरेथॉन शर्यतीला चार चाँद लावले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंपासून हौशी मंडळींनी या शर्यतीत हिरीरीने सहभाग घेतला. याप्रसंगी नेतेमंडळीपासून राज्यपाल, महापौर, सिनेस्टार, उद्योगपती, माजी खेळाडूंपर्यंत सर्वांनीच उस्फूर्त उपस्थिती दाखवून शर्यतीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. याप्रसंगी एका पायाने अधू असलेल्या एका युवकाने कृत्रिम पायासह शर्यतीत उतरून धाडशीपणा दाखवला. त्याचे हे धाडस पाहून उपस्थितांनी आणि या मॅरेथॉनचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या जगभरातील क्रीडाशौकिनांनी मुंबईकरांच्या या जिद्दीला सलामच ठोकला.

टांझानियाचा सिंबू चॅम्पियन

स्टॅण्डर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनच्या १४व्या आवृत्तीत यंदा केनिया आणि इथिओपियाचे वर्चस्व मोडीत काढत टांझानियाच्या अल्फोन्स सिंबूने चुरशीच्या झुंजीत बाजी मारत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. महिला आंतरराष्ट्रीय गटात केनियाच्या बोर्जेस कितूरने महिला गटाचे विजेतेपद आपल्या नावावर केले.

तरीही महाराष्ट्राच्या कन्येची सुवर्णझेप

ऑलिम्पियन ललिता बाबरच्या अनुपस्थितीत मुंबई मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम राखण्याची धुरा यंदा परभणीच्या ज्योती गवतेच्या खांद्यावर होती. एलीट गटात २ तास ५० मिनिटे ५३ सेकंद या वेळेत पूर्ण मॅरेथॉन जिंकत परभणीकर ज्योतीने सुवर्णपदक पटकावले. परभणी कृषी विद्यापीठात ज्योतीचा मॅरेथॉनचा  सराव चालतो. सिंथेटिक ट्रक नाही, अन्य कोणत्याही सुविधा नाहीत अशा कठीण परिस्थितीत ज्योती चक्क रस्त्यावर धावण्याचा सराव करते. दौडीसाठीच्या हायटेक सुविधा नाहीत अशा प्रतिकूल स्थितीत ज्योती सकाळ व संध्याकाळच्या सत्रात धावण्याचा सराव करतेय.

 

आपली प्रतिक्रिया द्या