पूरग्रस्त भागात गायी म्हशींचा मृत्यू, मुंबईवर दूध संकट

581
milk-deary

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरला पुराचा चांगलाच फटका बसला आहे. त्याचे परिणाम आता मुंबईवरही होण्याची शक्यता आहे. पूरग्रस्त भागात गायी म्हशींचा मृत्यू झाल्याने दूध संकलन घटले आहे. त्यामुळे मुंबईला होणारा दूधपुरवठा कमी होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई मिररने दिलेल्य वृत्तानुसार सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून मुंबईला मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होतो. दर दिवसाला कोल्हापूर जिल्ह्यातून दिवसाला 12 लाख तर सांगली जिल्ह्यातून 10 लाख लिटर दूधाचे संकलन होते. पुरानंतर यात कमालीची घट होऊन दिवसाला 60-70 टक्के दूध संकलन होत आहे.

पूरामुळे अनेक दुभत्या गायी म्हशींचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक गायी म्हशी या आजारी पडल्या आहेत. त्यासाठी डॉक्टरांना पूरग्रस्त भागात पाठवण्यात आल्याची माहिती स्वाभिमान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महावीर पाटील यांनी दिली आहे. जिथे गायी म्हशी आहेत त्यांना खायला चारा नाही असेही पाटील यांनी नमूद केले. तर दूध पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान वर्षभराचा काळ लागेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

दुग्दविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच मुंबईला दूध कमी पडून देणार नाही असे आश्वासन दिले आहे. मराठवाडा आणि विदर्भातून मुंबईला दूध पुरवठा केला जाईल आणि जरी पुरवठा कमी झाल्यास शेजारील राज्य कर्नाटक आणि गुजरातहून दूध मागवू असेही जानकर यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त भागात जनावरांसाठी 100 टन चारा पाठवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

गोकूळ संस्थेत दूध संकलनात 10 टक्क्यांनी घट झाली असून दीड लाख लिटर दूधाचा तुटवडा कमी असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. तर चितळेसंस्थेत 20-25 टक्क्यांनी दूध संकलन घटले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान संस्थेतही दूध संकलनात 25 टक्क्यांनी घट झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या