मेहबूब स्टुडिओ, जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये होणार क्वारेंटाइन सेंटर

वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओसह फोर्ट येथील जे. जे. स्कूल ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट्स, झेवियर्स कॉलेज आणि माटुंगा येथील रूपारेल कॉलेजमध्ये पालिका क्वारेंटाइन केंद्र सुरू करणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून संबंधित ठिकाणी पाहणी करून आढावा घेण्यात आला. वांद्रे मेहबूब स्टुडिओ येथे ठिकाणी एक हजार बेड सुरू करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने ठेवले आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पालिकेने क्वारेंटाइन केंद्र आणि बेडची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोठी सभागृहे, शाळा, हॉटेलनंतर आता मेहबूब स्टुडिओसारख्या मोठ्या जागाही ताब्यात घेतल्या जाणार आहेत. या ठिकाणी सध्या फक्त क्वारेंटाइन सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य असेल. पालिकेच्या एच पूर्व म्हणजेच वांद्रे पूर्व, खार सांताक्रुझ भागात रुग्णांची वाढत असल्यामुळे मेहबूब स्टुडिओत क्वारेंटाइनची सुुविधा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या भागातील रुग्णसंख्या सध्या एक हजारांवर गेली आहे.

‘ए’ वॉर्डमध्ये सुविधा वाढणार

पालिका मुख्यालय असलेल्या ‘ए’ वॉर्डमध्येही सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजारांवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर जे जे स्कूल ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट्समध्ये 80 बेड, सेंट झेवियर्स कॉलेजचा हॉल आणि कँटिनमध्ये १८० बेड आणि टेरेसवर ७० बेड क्वारेंटाइनसाठी सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे कोरोनाबाधित वाढणार्‍या ए वॉर्डमध्ये क्वारेंटाइनची सुविधा वाढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या